'दारुडा नाही मद्यप्रेमी, विमा अन् अनुदान द्या...', हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिय्या, मागण्या ऐकूण डोकं चक्रावेल!

Drunkards protested In Belagav : हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या.

सौरभ तळेकर | Updated: Dec 23, 2023, 10:37 PM IST
'दारुडा नाही मद्यप्रेमी, विमा अन् अनुदान द्या...', हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिय्या, मागण्या ऐकूण डोकं चक्रावेल! title=

Winter Session : आपण आतापर्यंत कित्येक आंदोलनं बघितली असणार, आंदोलनांमध्ये केल्या जाणाऱ्या बऱ्याच मागण्या पूर्ण देखील होतात. त्यामुळे विविध समस्यांसाठी आंदोलनं करण म्हणजे न्याय मागणं असतं. मात्र, हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी (Drunkards protested) आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. मंडपात एकत्र येत बॅनरबाजी करत दारुड्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची चर्चा रंगली होती. या दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पाहुयात..

दारुड्यांच्या मागण्या काय?

दारुडा शब्दावर बंदी आणा, मद्यप्रिय शब्द वापरा, तसेच मद्यप्रेमींसाठी विमा योजना लागू करा, अशी मागणी दारुड्यांनी केली आहे. मद्यपींच्या मुलांना मोफत शिक्षण द्या. मद्यविक्रीतून येणा-या नफ्यातून 10% अनुदान मंजूर करा, अशी अनोखी मागणी दारुड्यांकडून करण्यात आली आहे. मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 31 डिसेंबरला 'मद्यप्रिय दिवस' घोषित करा, तसेच मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका. बारमध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करा, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. मद्यपींचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा आणि गरीब मद्यपींना आवास योजना मंजूर करा, असं आगळीवेगळी मागणी देखील करण्यात आलीये.

मद्यप्रेमी आजारी पडल्यास त्याचा वैद्यकीय खर्च सरकारने करावा. अन्य महामंडळांप्रमाणे मद्यप्रेमी कॉर्पोरेशनची स्थापना करुन मद्यप्रेमींना दिलासा द्यावा, अशी मागणी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीने केली आहे. मद्यप्रेमी संघटनेचे हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरलंय. मद्यप्रेमींच्या या मागण्या ऐकून निवदेन स्विकारणाऱ्या मंत्र्यांना देखील हसू आवरले नाही.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मद्यपींनी हे आंदोलन केलंय. विशेष म्हणजे कर्नाटकच्या कामगार मंत्र्यांनीही या आंदोलनाची दखल घेतली. कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या आंदोलनाची चर्चा आहे. त्यामुळे आता मद्यपींच्या मागण्यांचं काय होतं याकडे लक्ष लागलंय.