नवी दिल्ली : काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.
पंजाबमधील मोहाली येथे इंडियन स्कूल आँफ बिझनेस लिडरशिप समिटमध्ये, ते बोलत होते. १९९१ सालच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंग ओळखले जातात. ते म्हणालेत, काही लॅटिन अमेरिकन देश वगळले तर नोटबंदी कोणत्याही देशात यशस्वी झालेली नाही.
अर्थव्यवस्था चांगली असताना तुम्ही चलनातील ८६ टक्के नोटा मागे घेता तेव्हा आता दिसत असलेले परिणाम अटळच आहे. नोटाबंदीमुळे घसरण होणार याचा अंदाज मी आधीच व्यक्त केला होता. जीएसटी लागू केल्यामुळे आपल्याला दीर्घकाळात फायदे दिसतील, मात्र सध्या काही उपायांची गरज आहे, असे ते म्हणालेत.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीचा दर ३५ ते ३७ टक्के होता मात्र आता तो ३० टक्क्यांच्या आत आलेला आहे, विशेषतः खासगी गुंतवणूक वाढताना दिसत नाही. देशात सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक होण्याची मोठी गरज आहे. मात्र विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ सार्वजनिक क्षेत्रावर विसंबून राहता येणार नाही, आपल्याला फॉरिन एक्स्चेंजवरही लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणालेत.