Diwali Latest update : सणासुदीचे दिवस जवळ आले की उत्साह आणि आनंदाला सीमा राहत नाहीत. पण, वाढता खर्च मात्र सातत्यानं अनेकांनाच भानावर ठेवण्याचं काम करत असतो. त्यात सर्वसामान्यांसाठी सणवारांचे हे दिवस म्हणजे एकिकडे आनंद तर, दुसरीकडे बसणारी खर्चाची फोडणी. पण, यंदाच्या वर्षी हे चित्र काहीसं वेगळं दिसू शकतं. कारण, ऐन दिवाळीच्या आधीच नागरिकांना खऱ्या अर्थानं एक मोठी भेट मिळाली आहे. पण आता ही भेट कितपत समाधानकारक आहे हे ठरवणं कसबच.
देशाच्या तेल बाजारपेठेत सोयाबीनच्या तेलाचे दर वगळता इतर सर्व प्रकारच्या तेलांच्या दरात घट पाहायला मिळाली आहे. ब्राझीलमध्ये हवामानाची परिस्थिती सुरळीत असल्यामुळं शिकागोमध्ये सोयाबीन डी आयल्ड केकच्या दरांमध्ये मागील आठवड्यात वाढ पाहिली गेली. परदेशातही सोयाबीनचे चढते दर पाहायला मिळाले. इथं भारतात 'राजा तेल' अशी ओळख असणाऱ्या सूर्यफुलाच्या घाऊक दरांमध्ये घट झाली असली तरीही किरकोळ विक्रीदरांमध्ये मात्र अपेक्षित घट झालेली नाही ही बाब लक्षात घ्यावी.
सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला शेंगदाणा तेल 50 ते 70 रुपये लीटर, सूर्यफुलाच्या बियांचं तेल 30 रुपये लीटर महाग आणि राईचं तेल 30 रुपयांच्या जास्त किंमतीनं विकलं जात आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिठाई, नमकीन आणि तत्सम पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या पामोलिन तेलाची किंमत कमी होऊन, त्याजागी सूर्यफुल आणि सोयाबीनच्या तेलाची मागणी वाढते. सध्या हीच मागणी पाहता आपण बऱ्याच अंशी परदेशी आयातीवरच अवलंबून असल्यामुळं देशातील रब्बी आणि खरीपाच्या पिकांमध्ये झालेली घट इथं फारसा परिणाम करताना दिसत नाही.
सध्याच्या घडीला देशातील तेल उत्पादन व्यवसायाची स्थिती अतिशय नाजूक असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या तेलाचे दर कमी असल्यामुळं घरगुती तेल उत्पादनांवर या दरांमुळं मोठं ओझं आहे. त्यातच परदेशी कंपन्यांकडून भारतात दिल्या जाणाऱ्या तेलाचे दर घटवणं सुरुच असल्यामुळं देशांतर्गत उत्पादन संस्थांवर यामुळं दडपण येताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्राकडून ही तफावत कमी करण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.