नवी दिल्ली : दिवळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊ घातला आहे. या सणाच्या येण्याची चाहूलही मोठ्या उत्साहात लागली आहे. अशा या सणाच्याच माहोलात येणारा एक दिवस म्हणदे धनत्रयोदशी. दरवर्षी कार्तिक महिन्यात हा दिवस साजरा केला जातो. या दिशशी धनवंतरी या देवाची पूजा केली जाते. या दिवशी सोनं, चांदीच्या वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी धनत्रयोदशी साजरा केली जाणार आहे.
नवी भांडी खरेदी करण्याची प्रथा
कार्तिक कृष्णपक्षातील त्रयोदशी तिथीच्या दिवशी धन्वंतरीचा जन्म झाला होता. त्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. धन्वंतरी जन्मास आले तेव्हा त्यांच्या हाती अमृताचा कलश होता. त्यामुळंच या दिवशी भांडं खरेदी करण्याला महत्त्वं आहे. त्यातही कलश खरेदी करणं फायद्याचं. या दिवशी खरेदी केल्यामुळं ती १३ पटींनी वाढते अशी धारणा आहे. अख्खे धणे खरेदी करुन तेसुद्धा तिजोरीत ठेवले जातात. दिवाळीनंतर हे धणे बगीचा किंवा शेतात रोवले जातात.
सागर मंथनाच्या वेळी ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी उदयस आली होती, त्याचप्रमाणं धन्वंतरीसुद्धा अमृत कलशासह याच सागर मंथनातून आले. लक्ष्मी ही धनाची देवता आहे. पण, तिची कृपा होण्यासाठी आरोग्य आणि उदंड आयुष्य गरजेचं असतं. त्यामुळंच दिवाळीच्या आधीपासून म्हणजेच धनत्रयोदशीपासून दीपमाळांची आरास सजण्यास सुरुवात होते.