नवी दिल्ली : राम मंदिर निर्माणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपा सरकारने राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात मंदिर न उभे राहिल्याने उजव्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रयागराजमध्ये कुंभ दरम्यान झालेल्या धर्म संसदेत राम मंदिर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राम मंदिर प्रकरणाला आता वेगळे वळण मिळणार आहे. केंद्र सरकारने यावर अध्यादेश काढून आश्वासन पूर्ण करावे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सहित अनेक उजव्या संघटनांची ईच्छा आहे. पण आता धर्म संसदेत राम मंदिर निर्माणाचा निर्णय झाला आहे. केंद्र सरकार या साऱ्याला कसे सामोरे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ज्योतीष पीठाधीश्वर स्वरूपानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत झालेल्या 3 दिवसीय धर्म संसदेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार 21 फेब्रुवारीला अयोध्येत राम मंदीराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे. 28 ते 30 जानेवारी दरम्याने ही धर्म संसद पार पडली. यामध्ये ज्योतिष पीठाधीश्वर स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी धर्म संदेश दिला. त्यानुसार वसंत पंचमीनंतर हिंदू समाज प्रयागराज मधून अयोध्येसाठी रवाना होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अयोथ्येत एकत्र झालेल्यांना गोळ्यांचा सामना करावा लागला तरी मागे हटायचे नाही असेही त्यांनी म्हटले.
सविनय अवज्ञा आंदोलनाच्या पहिल्या चरणात हिंदूंची मनोकामना पूर्ण होण्यासाठी यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद तसेच शतपथ ब्राम्हणमध्ये दाखवल्या गेलेला इष्टिका न्यास विधि संमत करण्यासाठी 21 फेब्रुवारीचा शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे. यासाठी गोळी खावी लागली, जेल जावे लागले तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत असे धर्मादेशात म्हटले आहे. या कार्यात सत्ताधाऱ्यांकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्या प्रत्येक हिंदूचे हे कर्तव्य आहे की चार विटा घेऊन अयोध्येत नेत त्यांची वेदोक्त पद्धतीने पूजा करावी असेही यात म्हटले आहे.