नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या रोहिणी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. व्यायाम करताना (Workout in GYM) ट्रेडमिलमध्ये (Tredmill) अचानक करंट आला आणि त्या धक्क्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर जीम चालकाविरुद्ध (Gym Owner) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सक्षम प्रूथी असं मृत तरुणाचं नाव आहे. रोहिणी सेक्टर 19 मध्ये तो राहात होता. याच परिसरात असणाऱ्या जिम्प्लेक्स फिटनेस जोनमध्ये तो नियमित व्यायाम करण्यासाठी जात होता.
सक्षम हा बीटेक इंजिनिअर होता. गुरुग्राममधल्या एका खासगी कंपनीत तो कामाला होता. मगंळवारी सकाळी 7.30 वाजता नेहमीप्रमाणे सक्षम व्यायाम करण्यासाठी जिम्प्लेक्स फिटनेसमध्ये गेला. सुरुवातीला तो ट्रेडमिलवर एक्सरसाईज करत होता. अचानक ट्रेडमिलमध्ये विद्युत पुरवठा उतरला आणि सक्षम विद्युत पुरवठ्याच्या संपर्कात आला. हा धक्का इतका जोरदार होता की सक्षम जागेवरच कोळसला आणि तब्येत बिघडली. सक्षम कोसळल्यानंतर जिममध्ये एकच खळबळ उडाली जिममधल्या इतर लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी सक्षमला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस जिम्प्लेक्स फिटनेसमध्ये दाखल झाले आणि तपास सुरु केला. सक्षमचा मृतदेह पोस्टमॉर्टेम रिपोर्टसाठी पावण्यात आला. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर सक्षमचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचं समोर आलं. सक्षमच्या कुटुंबियांनी याप्रकरणी जीम चालकाविरोधात तक्रार दाखल केली. जीम चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी जिम चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
जोडप्याला मारहाण
दरम्यान, दक्षिण-पश्चिम दिल्लीतल्या द्वारकामध्ये जमावाने महिला पायलट आणि तिच्या पतीला रस्त्यावर खेचून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जमावाने महिलेला तिच्या घरातून केसांना खेचून आधी बाहेर काढलं त्यानंतर रस्त्यावर आणून तिला मारहाण केली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही जमावाने जबर मारहाण केली. या जोडप्याने घरात एका दहा वर्षांच्या मुलीला घरकामासाठी ठेवलं होतं. त्यांनी त्या मुलीवर अनेक अत्याचार केले होते. त्या मुलीला मारहाण करण्यात येत होती, तिच्या शरीरावर जखमी आढळल्या. शिवाय तिचा चेहराही सुजला होता. ही गोष्ट लोकांना कळताच महिलेच्या घरावर लोकं जमली. त्यानंतर महिला आणि तिच्या पतीला बाहेर काढून लोकांनी मारहाण केली.