Delhi riots: योगेंद्र यादव, सीताराम येचुरींवर जमावाला चिथावल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

या सर्व नेत्यांनी CAA विरोधकांनी कोणत्याही थराला जा, असे सांगितले. तसेच CAA आणि NRC हे मुस्लिमविरोधी असल्याचे सांगून लोकांमध्ये असंतोष निर्माण केला.

Updated: Sep 12, 2020, 11:53 PM IST
Delhi riots: योगेंद्र यादव, सीताराम येचुरींवर जमावाला चिथावल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल title=

नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणातील पुरवणी आरोपपत्रात पोलिसांकडून देशातील अनेक बड्या नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, लघुपट निर्माते राहुल रॉय आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपुर्वानंद यांचा समावेश आहे. या सर्वांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या CAA विरोधकांना जमवल्याचा आणि त्यांना चिथावणी दिल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. 

दिल्ली हिंसाचारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जबानीवरून पोलिसांनी या नेत्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जेएनयूची विद्यार्थीनी देवांगना कालिता आणि नताशा नरवाल तसेच जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाची विद्यार्थीनी गुलफिशा फातिमा यांची जबानी महत्त्वपूर्ण ठरली आहे. पावसाळी अधिवेशनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. देवांगना कालिता आणि नताशा नरवाल या दोघींनी दंगलीतील आपला सहभाग मान्य केला आहे. तसेच जयंती घोष, अपुर्वानंद आणि राहुल रॉय यांनी आपल्याला आंदोलन करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

या सर्व नेत्यांनी CAA विरोधकांनी कोणत्याही थराला जा, असे सांगितले. तसेच CAA आणि NRC हे मुस्लिमविरोधी असल्याचे सांगून लोकांमध्ये असंतोष निर्माण केला. तसेच भारत सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी आंदोलन केले, असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. दिल्लीच्या उत्तर पूर्व जिल्ह्यात २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या रोजी झालेल्या दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता तसेच ५८१ लोक जखमी झाले होते. ज्यांपैकी ९७ गोळी लागून जखमी झाले होते.