दुसरीची हत्या करून पहिल्या पत्नीसोबत पळाला नवरा

आरोपी सुरेश थेट नेपाळा पळून गेला. मात्र, पोलिसांनी सुरेशला नेपाळमधून अटक केली. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 4, 2018, 02:39 PM IST
दुसरीची हत्या करून पहिल्या पत्नीसोबत पळाला नवरा title=

नवी दिल्ली: पहिल्या पत्नीसोबत राहण्यासाठी कासावीस झालेल्या एका फिजियोथेरपिस्टने आपल्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली आहे. हत्या केल्यावर या फिजिओथेरीपिस्टने पहिल्या पत्नीसोबत पोबारा केला. मात्र, जाता जाता आपल्या दुसऱ्या बायकोचा मृतदेह त्याने बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला. काही दिवसांनतर पोलिसांनी या महिलेचा मृतदेह तुगलकाबाद येथून ताब्यात घेतला.

आरोपी पेशाने फिजिओथेरीपिस्ट

सुरेश सिंह असे आरोपीचे नाव असून, तो पेशाने फिजिओथेरीपिस्ट आहे. तर, मारिया मेसी असे त्याच्या दुसऱ्या (मृत) पत्नीचे नाव आहे. पती सुरेश सिंह याने मेसीचा मृतदेह बेडमध्ये एवढ्याचसाठी ठेवला की, थंडीचे दिवस असल्याने मृतदेह गोठला जाईल. तसेच, तो काही दिवस ठिक राही. त्यामुळे मृतदेहाची पुढे कशी विल्हेवाट लावायची यावर विचार करायला वेळ मिळेल, असा विचार त्यामागे होता.

विवाहानंतर बदलले नाव

दरम्यान, मारिया मेसीने सुरेश सोबत विवाह केल्यावर स्वत:चे नाव बदलून सावित्री मेहरा असे केले होते. तिची हत्या केल्यावर सुरेश उत्तराखंड येथील आपल्या घरी पळून गेला व तो तेथेच राहू लागला. मात्र, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुरेशला ताब्यात घेतले.

पहिल्या पतीला आला संशय

मारिया अचानक बेपत्ता झाल्यावर तिचा पहिला पती उसमान याला संशय आला. त्याने मारियाच्या बहिणीसोबत बोलणे केले. उसमान मारियाच्या घरी गेला तेव्हा घराला कुलूप होते. त्यानंतर त्याने सुरेशला कॉल केला पण, त्याने फोनच स्विकारला नाही. मात्र, सुरेशने त्याला मेसेज पाठवला की, आपण मारियासोबत बाहेर आहोत. त्यामुळे फोनवर बोलू शकत नाही. दरम्यान, संशय अधिकच बळावल्यामुले उस्मानने काही लोकांच्या मदतीने मारियाच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा तिची हत्या झाल्याची धक्कादायक सत्त पुढे आले.

सहमतीने झाले वेगळे

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा गुन्हा दाखल केला. तसेच, सुरेशला पकडण्याची तयारी करण्यात आली. मारियाचा माजी पती उस्मानने सांगितले की, त्याची आणि मारियाचे २०१५ मध्ये लग्न झाले होते आणि २०१२ मध्ये ते सहमतीने वेगळे झाले होते. फेसबुकच्या माध्यमातून सुरेश आणि मारिया यांच्यात ओळख झाली होती. दोघांमधल्या ओळखीची जागा प्रेमाने घेतली. दोघे एकत्र राहुल लागले. पण, घरच्यांना या गोष्टीची माहिती कळताच घरच्यांनी सुरेशचे लग्न लता नावाच्या दुसऱ्या मुलीशी लावून दिले.

फेसबुक, मैत्री, दबाव आणि लग्न

दरम्यान, मारियाला सुरेशच्या लग्नाची खबर फेसबुकच्या माध्यमातूनच लागली. मग तिनेही सुरेशवर दबाव टाकला. त्यामुळे सुरेशने तिच्यासोबतही लग्न केले.

नेपाळमधून अटक

दरम्यान, मारियाच्या हत्येची माहिती कळताच पोलिस सुरेशच्या मागावर राहिले. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच सुरेश थेट नेपाळा पळून गेला. मात्र, पोलिसांनी सुरेशला नेपाळमधून अटक केली. सुरेशने पोलिसांना सांगितले की, तिने लग्नासाठी सुरेशवर दबाव टाकला तेव्हापासूनच तो चिडला होता. तसेच, त्याची पहिली पत्नी लतानेही मारियापासून दूर होण्याबाबत सतत आग्रह धरला होता. सुरेशलाही मारियापासून वेगळे व्हायचेच होते. शेवटी त्याने तिची हत्या केली.