दिल्ली मेट्रो स्थानकावर 'गोली मारो'चे नारे; सहा जण ताब्यात

भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि कुर्ता परिधान केलेल्या पाच ते सहा तरुणांनी मेट्रो स्टेशनवर ट्रेन येत असताना घोषणाबाजी सुरु केली.

Updated: Feb 29, 2020, 06:25 PM IST
दिल्ली मेट्रो स्थानकावर 'गोली मारो'चे नारे; सहा जण ताब्यात title=

नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा प्रकार ताजा असतानाच शनिवारी समाजकंटकांकडून पुन्हा एकदा शहरातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होताना दिसले. दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या परिसरात दुपारी १२.३० वाजता एका टोळक्याने ‘देश के गद्दारो को, गोली मारो’अशी घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घोषणबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि कुर्ता परिधान केलेल्या पाच ते सहा तरुणांनी मेट्रो स्टेशनवर ट्रेन येत असताना घोषणाबाजी सुरु केली. ट्रेन निघून गेल्यानंतरही CAA समर्थनाचे आणि 'गद्दारो को गोली मारो' अशी त्यांची घोषणाबाजी सुरु होती. तरुणांच्या नारेबाजीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राजीव चौक मेट्रो स्टेशवरून नारेबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. 

दिल्ली हिंसाचार : ८७ जणांना गोळी लागली, पोलिसांची मोठी चूक उघड

दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रचारसभेत देश के गद्दारोंको.... गोली मारो', असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. यानंतर निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाईही केली होती. निवडणूक आयोगाने त्यांना ७२ तासांसाठी प्रचारबंदी केली होती.

दिल्ली हिंसाचार : ज्यांची घरे जळली आहेत त्यांना रोख २५ हजार - केजरीवाल