DU Student Stabbed To Death: दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. शाब्दिक वादानंतर लेक्चरसाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर एका विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार हत्या करण्यात आलेला तरुण 19 वर्षांचा आहे. या मुलाच्या गर्लफ्रेण्डची काही जणांनी छेड काढली असता याच मुद्द्यावरुन वाद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौघांना अटक केली आहे. मरण पावलेल्या मुलाचं नावं निखील चौहान असं आहे. निखिल हा दिल्लीमधील पश्चिम विहारचा रहिवाशी होता.
दिल्ली विद्यापीठ परिसरात असलेल्या आर्यभट्ट कॉलेजच्या गेटवर रविवारी सायंकाळच्या सुमारास हा संपू्र्ण प्रकार घडला. मुक्त अभ्यासक्रमाअंतर्गत दाखल घेतलेला निखील लेक्चरसाठी या ठिकाणी आला होता. निखीलवर हल्ला करणाऱ्या तरुणांबरोबर त्याचा आठवडाभरापूर्वी वाद झाला होता. गर्लफ्रेण्डची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोरांना निखीलने विरोध केला होता. त्यावेळेस प्रकरण बाचबाचीवर संपलं. मात्र सात दिवसांनी या तरुणांनी निखिलला निर्जनस्थळी एकटं गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
जखमी अवस्थेत निखीलला मोती बाग येथील चरक पालिका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्याला दाखल करुन घेण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. निखील हा पॉलिटीकल सायन्सचा पहिल्या वर्षाचा रहिवाशी होता.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरांमधील फुटेजच्या आधारे काही जणांना अटक करण्यात आली आहे. घटनाक्रम घडला त्या ठिकाणाची पहाणी करुन नेमकं काय काय आणि कसं घडलं असेल याचा अंदाज पोलिस बांधत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र टीम स्थापन करण्यात आली आहे.
A student was stabbed to death in Delhi University's South Campus. Preliminary investigation reveals that there was a fight between them. The accused has been identified and is being traced. Further investigation underway: Delhi Police pic.twitter.com/KrMx71oDT0
— ANI (@ANI) June 18, 2023
निखीलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो नातेवाईखांना सोपवण्यात आला. दिल्ली विद्यापीठाने घडलेला हा प्रकार फार दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. ज्या ठिकाणी मुलं शिकायला आणि त्यांचं करिअर बनवायला येतात त्याच कॉलेजच्या गेटवर घडलेल्या या प्रकरणामध्ये एका मुलाने जीव गमावला हे फारच खेदजनक आहे. "विद्यार्थ्याचा जीव गेल्याने आम्ही फार दु:खी आहोत. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो. त्याच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो," असं विद्यापीठाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.