रेल्वे स्टेशनवरील पार्सलमधून विचित्र आवाज; उघडल्यावर सगळयांनाच बसला धक्का

पुन्हा एकदा स्टेशनवर एका घटनेनं भीतीचं वातावरण पसरलं

Updated: Jun 28, 2021, 09:06 AM IST
रेल्वे स्टेशनवरील पार्सलमधून विचित्र आवाज; उघडल्यावर सगळयांनाच बसला धक्का  title=

मुंबई : दरभंगा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा अफवांमुळे गोंधळ उडाला. दरभंगामध्ये 17 जून रोजी सिकंदराबादहून आलेल्या पार्सलमध्ये झालेल्या धमाक्यानंतर (Darbhanga Station Blast) शनिवारी पुन्हा एकदा स्टेशनवर एका घटनेनं भीतीचं वातावरण पसरलं. 

शनिवारी दिल्लीवरुन आलेल्या एका पार्सलमधून येणारे आवाज ऐकूनन सगळेच उपस्थित लोक घाबरून गेले. स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. याची माहिती लगेचच आरपीएफला देण्यात आली. यानंतर आरपीएफद्वारे बॉम्ब (Bomb) निकामी करणारं पथक (Bomb Squad) बोलावून तपास करण्यात आला. 

दरभंगा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीहून बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसनं काही पार्सल आले होते, हे ट्रेनमधून खाली घेऊन दरभंगा स्टेशनवरील प्लॅफॉर्म नंबर एकवर आणले जात होते. मात्र, यातील एक पार्सल खाली घेताच यातून मोठ्यानं आवाज येऊ लागले. यानंतर तिथे उपस्थित लोक आणि कामगार दूर जाऊन उभा राहिले. याची सूचना आरपीएफसोबतच जीआरपीला दिली गेली. घटनास्थळी पोलिसही  दाखल झाले मात्र प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकालाही बोलावण्यात आलं.

या टीमनं पार्सलची तपासणी केली. पार्सलमध्ये काहीही धोकादायक वस्तू नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी अमन कुमार झा या पार्सल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून ते पार्सल उघडून घेतलं. यानंतर समजलं, की मोबाईलच्या पार्ट्ससोबत यात ब्लूट्यूथ स्पीकर मागवलं गेलं होतं. दाब पडल्यानं स्पीकर ऑन झाला आणि याच्याच आवाजानं लोकांमध्ये गोंधळ उडाला.

पार्सल घेण्यासाठी आलेला रिसिव्हर आणि मोबाईल दुकानदार अमन कुमार झा यांनी सांगितलं, की लहेरियासरायमध्ये त्यांचं मोबाईलचं दुकान आहे आणि त्यांनी दिल्लीहून मोबाईल डिव्हाइसेसचं एक पार्सल मागवलं होतं. या पार्सलमध्ये ब्लू ट्यूथ स्पीकरही होतं.  खाली घेत असताना ब्लूट्यूथच्या स्पीकरमधून आवाज आला. यानंतर तपासाला सुरुवात झाली. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातील अधिकारी चंद्रशेखर पासवान यांनी सांगितलं, की स्टेशनवर आढळलेल्या संशयित पार्सलबाबत ऐकताच लोक याठिकाणी पोहोचले. मात्र, तपासात याच काहीही संशयित किंवा धोकादायक वस्तून नसल्याचं समोर आलं.