दिवाळीला कंपनीने बोनस दिला नाही, कर्मचाऱ्याच्या कृत्याने पोलिसही हादरले

पगार कमी त्यातच बोनस नाही, वैतागलेल्या कर्मचाऱ्याने उचललं असं पाऊल  

Updated: Oct 23, 2022, 04:36 PM IST
दिवाळीला कंपनीने बोनस दिला नाही, कर्मचाऱ्याच्या कृत्याने पोलिसही हादरले title=

Crime News : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असं म्हटलं जात. या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. नोकरदारवर्ग दिवाळीच्या बोनसची वाट पहात असतो. कुटुंबियांना नविन कपडे, घरात नविन वस्तू घेण्यासाठी बोनसच्या एकरकमी पैशांचा उपयोग होता. पण बोनस मिळाला नाही तर मात्र मोठा अपेक्षाभंग होतो. अशीच एक घटना समोर आली आहे. कंपनीने बोनस न दिल्याने कर्मचाऱ्याने धक्कादायक पाऊल उचललं.

कर्मचाऱ्याने आखला प्लान
छत्तीसगडच्या रायपूरमधली ही धक्कादायक घटना आहे. कंपनीने बोनस न दिल्याने कर्मचारी गुन्हेगारीकडे वळला. त्याने आपल्या काही साथीदारांना हाताशी धरत कंपनीच लूटण्याचा प्लान आखला. त्यानंतर खोटी कहानी रचली. पण पोलिसांच्या नजरेपासून तो फार काळ दूर राहू शकला नाही. पोलिसांनी प्रकरणचा तपास करत आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली.

एसपी गोयल नावाच्या कंपनीतील खजिनदार कर्मचाऱ्यांच्या पगाराची बॅग घेऊन बँकतून येत होते. त्याचेवळी रस्त्यात काही लोकांनी त्यांना लूटलं आणि लाखो रुपयांची बॅग घेऊन फरार झाले. कंपनीत काम करणाऱ्या आणि खजिनदाराबरोबर असणाऱ्या सुशांत नावाच्या कर्मचाऱ्याने याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत परिसरात लागलेले सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीत काही लोकं लूट करताना दिसले. तर परिसरातील आणखी एका सीसीटीव्हीत लूट करणारी लोकं कंपनीत काम करणाऱ्या विद्याधर नावाच्या कर्मचाऱ्यासोबतही दिसले. पोलिसांना विद्याधरवर संशय आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. आधी विद्याधरने नकार दिला, पण पोलिसांनी हिसका दाखवातच विद्याधरने गुन्हा कबूल केला.

का केला गुन्हा?
खजिनदार बँकेतून कधी निघणार याची विद्याधरला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे आधीपासूनच त्याने आपल्या साथीदारांना याची कल्पना दिली होती. जसा खजिनदार बँकेतून पैशांची बॅग घेऊन निघाला, तसं आरोपींना त्याला रस्त्यात गाठत त्याच्याजवळची 1 लाख 70 हजार रुपयांची रोकड लुटली. 

विद्याधरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला कमी पगार होता, यावरुन कंपनीच्या मॅनेजमेंटबरोबर त्याचं अनेकवेळा भांडणही झालं होतं. त्यातच दिवाळीत कंपनीने बोनसही दिला नाही. त्यामुळे झटपट पैशांसाठी विद्याधरने लुटीचा प्लान आखला. पोलिसांनी विद्याधरला अटक केली आहे.