Crime News : घरात लहान मुल (Children) असेल तर त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नजर थोडीसी जरी चुकली तरी अघटीत घडू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 महिन्यांच्या एका चिमुलकीचा बादलीत (Bucket) बुडून मृत्यू झाला. आईने आपल्या दोन लहान मुलींसमोर टेडिबेअर (Teddybear) धुवून सुकत घातला. याचंच अनुकरण मुलींनी केलं. त्यांनी आपल्या 2 महिन्यांच्या लहान बहिणीला बाथरुममध्ये नेलं आणि टेडिबेअरसारखी आंघोळ घालण्याचा प्रयत्न केला. पण यात त्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
काय आहे नेमकी घटना?
मध्यप्रदेशमधल्या नर्मदापुरममधली (Narmadapuram) ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे. जिल्ह्यातल्या सोहागपूर इथं आसिफ खान हा आपल्या कुटुंबासोबत राहतो. आसिफ खान हा फळविक्रेता असून कुटुंबात पत्नी आणि तीन मुली आहेत. घटनेच्या दिवशी आसिफ खान यांच्या पत्नीने आपल्या मुलींची घाण झालेली काही खेळणी धुतली. यात टेडिबेअरही होता. काम करत असताना समोर तिच्या 4 वर्षांची आणि 7 वर्षांची मुली उभ्या होत्या. टेडीबेअरला स्वच्छ करत असताना त्या पाहात होत्या. टेडिबेअर धुवून झाल्यावर आईने तो सुकत घातला आणि आपलं काम करण्यासाठी ती स्वंयपाकघरात निघून गेली.
टेडीबेअरसारखी बहिणीला आंघोळ घालण्याचा प्रयत्न
टेडीबेअरसारखचं आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला आंघोळ घालण्याचं दोनही बहिणींनी ठरवलं आणि त्यांनी बहिणीला उचलून बाथरुमध्ये नेलं. बाळाला आंघोळ घालत असताना त्यांच्या हातून ती निसटली आणि पाण्याने भरलेल्या बादलीत पडली. तिला बाहेर काढण्याच दोनही बहिणींना प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आलं नाही. बाळ बाहेर काढता येत नसल्याने त्या घाबरल्या आणि त्यांनी बादलीवर झाकण टाकलं. त्यानंतर त्या तिथून बाहेर पडल्या.
बाळ दिसत नसल्याने आईची शोधाशोध
स्वयंपाकघरातलं काम आटपून आई बाहेर आली, पण जागेवर बाळ दिसत नसल्याने ती घाबरली. तीने तात्काळ आपल्या पतीला फोन करुन याची माहिती दिली. याबाबत पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध सुरु केला. तपासादरम्यान, बाळ घरातल्याच बाथरुममधल्या बादलीत मृतावस्थेत आढळलं. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला घराजवळील एका भिकाऱ्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली. पोलिसांनी बाळाच्या आई-वडीलांचीही चौकशी केली. पण काहीच धागे-दोरे हाती लागत नव्हते.
असा झाला प्रकरणाचा उलगडा
दोन महिन्यांचं मूल बादलीत पडलं कसं? बादलीवर झाकण लावलं कोणी? असे प्रश्न अनुत्तरीत होते. काहीच थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांनी अखेर घटनेच्या दिवशी घरात असलेल्या दोन बहिणींना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यांच्या चौकशीच सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. दोघींनीही त्या दिवशी नेमकं काय घडलं हे पोलिसांना सांगितलं. आईने टेडीबेअरला आंघोळ घातली, तशीच आंघोळ लहान बहिणीला घातली पण ती हातून निसटून बादलीत पडली असं मुलींनी सांगितलं.
मुली लहान आणि निरागस असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, घरी लहान मुल असल्यास त्याच्यावर लक्ष ठेवा असं आव्हान पोलिसांनी केलं आहे. तसंच पाणी आणि आगीपासून लहान मुलांना दूर ठेवा, लहान मुलांसमोर असं कोणतंही काम करु नका ज्याचं ते अनुकरण करतील असंही पोलिसांनी सांगितलं आहे.