Covid-19 नव्या प्रकाराने वाढवली चिंता, आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

Covid-19 omicron sub-verient : दिवाळीच्या आधी प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहे. कारण कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात दाखल झाला आहे.

Updated: Oct 18, 2022, 11:02 PM IST
Covid-19 नव्या प्रकाराने वाढवली चिंता, आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक title=

omicron sub-verient : भारतात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार देखील सतर्क झालं आहे. नवीन प्रकाराचा धोका वाढू शकतो. देशात ओमायक्रॉनच्या XBB या नवीन सब-व्हेरियंटचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री (Health Minister) मनसुख मांडविया यांनी दिल्लीत आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती आहे.

दिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर हा व्हायरस आढळल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. याआधी मुंबई महापालिकेने (BMC guidelines) देखील गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोविड-19 (Covid 19) च्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवीन उप-प्रकार भारतात सापडल्याने तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की हे नवीन प्रकार इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरत आहे आणि जर निष्काळजीपणा केला गेला तर कोविड संसर्गाची प्रकरणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नीती आयोगाचे (NITI Ayog) सदस्य व्हीके पॉल, कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष, एनटीजीआयचे अध्यक्ष एनके अरोरा, एनटीजीआयचे अधिकारी, एनईजीव्हीएसीचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ आरोग्य अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

Omicron च्या नवीन सब-व्हेरियंटचे नाव BA.5.1.7 आहे. गेल्या एका आठवड्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 17.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये SARS-CoV-2 व्हायरस (Omicron) चे सबवेरिएंट XBB चा समाविष्ट आहे. केरळसह देशाच्या काही भागात हा नवीन प्रकार आढळून आला आहे.

तज्ज्ञांनी म्हटले की, फ्लू सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी कोविडचे नियम पाळावे. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.

केरळच्या आरोग्य विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड-19 चा नवीन प्रकार आजपर्यंतच्या कोणत्याही प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. सुमारे 1.8 टक्के संक्रमित लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असू शकते. सध्या चिंतेचे कारण नाही. मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. प्रत्येकाने आपल्या सुरक्षेसाठी योग्य प्रकारे मास्क लावावा. वृद्धांनीही मास्क वापरावे. विमानतळावर आणि बंद ठिकाणी मास्क घालावेत, अशी विनंती आरोग्यमंत्र्यांनी केली.