नवी दिल्ली : CORONAVIRUS कोरोना विषाणूशी लढण्यासाठी म्हणून सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. बहुविध मार्गांनी या विषाणूशी लढा सुरु आहे. असं असतनाच देशाच्या राजकीय पटलावरही या वातावरणआत आरोप प्रत्यारोपांची सुरु असणारी सत्र सुरुच आहेत. कितीही नाकारलं तरीही सोशल मीडियावर याचीच झलक पाहायला मिळाली. जिथे, राहुल गांधी यांना उत्तर देत भाजपकडून करण्यात आलेलं एक ट्विट अवघ्या काही मिनिटांमध्येच डिलीट करण्यात आलं.
केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू या ऍपवर राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्या या ट्विटला भाजपकडून उत्तरही देण्यात आलं. पण, हे उत्तर फार काळ काही सोशल मीडियावर टीकलं नाही, कारण ते डिलीट करण्यात आलं.
गांधी यांच्या या प्रश्नावर भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये एका पाण्याच्या उंच टाकीवर एक गाढव उभं राहिलेलं दिसलं. या टाकीवर काँग्रेस असं लिहिण्यात आलं होतं. शिवाय हा खाली कसा येणार हा प्रश्न नसून इथे याला वर चढवलं कोणी, हा प्रश्न आहे असंही त्यावर लिहिण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या ट्विटची क्षणार्धात चर्चा सुरु होताच, अवघ्या काही मिनिटांत ते मागेही घेण्यात आलं. ज्यानंतर राजकीय वर्तुळात आणखी नव्या चर्चेने डोकं वर काढलं.
कोरोनाशी देशाची झुंज सुरु असतानाच आरोग्य सेतू नावाचं एक अॅप हे सर्वांसाठीच मदतीचं ठरणार आहे, असं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी हे कॅप डाऊनलोड करणं बंधनकारही करण्यात आलं होतं. शिवाय इतरही कर्मचाऱ्यांनी हे ऍप डाऊनलोड करावं असं सांगण्यात आलं. यातच काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी या ऍपमध्ये खासगी माहितीविषयी काही प्रश्न उपस्थित करत ते वापरणाऱ्यांच्या प्रायव्हसीविषयीचा मुद्दा प्रकाशझोतात आणला होता.