Coromandel Train Accident Latest Update: ओडिशातल्या बालासोर इथे झालेल्या कोरोमंडल रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 233 वर गेला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 900 जण जखमी झालेत. जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. बहानागा स्टेशनजवळ हा अपघात झाला. दोन एक्स्प्रेस गाड्या आणि एक मालगाडी एकमेकांवर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे.
कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातला मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे. रेल्वे रुळांवर तीन गाड्यांचे उलटलेले डबे, मोडलेले इलेक्ट्रीक खांब असं भयानक दृश्य आहे. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना 10 लाख रुपये देण्यात येणार असून गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.
बालासोर इथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर ओडिशाने राजकीय दुखवटा जाहीर केलाय. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुखवटा जाहीर केलाय. मुख्यमंत्री पटनायक आज थोड्याच वेळात घटनास्थळावर जात पाहणी करणार आहेत. तसेच भीषण रेल्वे अपघाताचा परिणाम भारतीय रेल्वे गाड्यांच्या वेळेपत्रकावरही झालाय. अपघातात कोरोमंडल मार्ग विस्कळीत झालेला पाहून भारतीय रेल्वेने तीन जूनसाठी अनेक गाड्यांचे मार्ग वळवले आहेत. तसेच अनेक गाड्या रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशातील रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पश्चिम बंगालमधील लोकांच्या मदतीसाठी त्यांनी कोलकाता येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्याची घोषणा केली.
मुंबई - गोवा अशा धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा आजचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मडगाव ते सीएसएमटी या मार्गावर वंदे भारत रेल्वे नियमितपणे 5 जूनपासून धावणार होती. त्याआधी उद्धघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, कोकणातील रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. माणगाव रेल्वे स्टेशनला प्रवासी घेऊन निघालेल्या रिक्षाला समोरुन येणा-या ट्रकनं जोरदार धडक दिली. अपघाताचा हा थरार सीसीटिव्हीत चित्रित झाला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.