नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

Nuh Violence : ऑगस्टमध्ये नूह येथे उसळलेल्या जातीय हिंसाचारात आरोपी म्हणून नाव असलेले हरियाणाचे काँग्रेस आमदार मम्मन खान यांना गुरुवारी अटक करण्यात आली. पोलिसांना त्यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

आकाश नेटके | Updated: Sep 15, 2023, 07:56 AM IST
नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे title=

Nuh Violence : नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलीस (Haryana Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा पोलिसांनी काँग्रेस (Congress) आमदार मामन खानला (MLA Maman Khan) अटक केली आहे. मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे. आता मामन खानला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा काँग्रेस आमदाराला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी चौकशीत सहभाग घेतला नाही. नूह हिंसाचार भडकावल्याचा आरोप मामनवर आहे. भाजपाने (BJP) सुरुवातीपासूनच मामन खानला या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड म्हटले आहे.

नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलिसांनी मोनू मानेसरनंतर आता काँग्रेस आमदार मम्मन खानला फिरोजपूर झिरका येथून गुरुवारी रात्री अटक केली. नूह हिंसाचारात मामन खानलाही आरोपी करण्यात आले आहे. मामनला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हरियाणा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात काँग्रेस आमदाराच्या सहभागाचे पुरेसे पुरावे आहेत. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी मामन खानने मंगळवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर 19 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच हरियाणा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे.

काँग्रेस नेत्याला पुराव्याचे योग्य मूल्यांकन केल्यानंतरच या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती हरियाणा पोलिसांनी हायकोर्टाला दिली आहे. पोलिसांकडे मामन खानचे फोन कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे चौकशीसाठी टाळाटाळ करणाऱ्या मामन खानने तपासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असावेत, अशी मागणी केली होती. नूह हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित प्रकरणे एसआयटीकडे वर्ग करण्यात यावीत, असेही मामन खानने म्हटलं होतं.

आरोप काय?

राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, जिथे हिंसाचार झाला, तिथे मामन खान आधी गेले होते. मात्र काँग्रेस आमदाराने असे सर्व आरोप फेटाळून सतत स्वत:ला निर्दोष घोषित केले होते. नूह पोलिसांनी तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी मामन खानला दोनदा समन्स पाठवले होते. मात्र, दोन्ही वेळा तो तापाचे कारण सांगून पोलिसांसमोर हजर झाला नाही. 

नेमकं प्रकरण काय?

31 जुलै रोजी हरियाणाच्या नूह येथील विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर जमावाने दगड आणि काठ्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे नूह, गुरुग्राम, फरीदाबाद, पलवल, रेवाडीसह आसपासच्या भागात जातीय हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी गुरुग्राममधील मशिदीवर झालेल्या हल्ल्यात नायब इमाम मारला गेला होता.