कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद

कर्नाटकातील सरकार 5 वर्ष पूर्ण करणार का...?

Updated: May 25, 2018, 07:56 PM IST
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते जी परमेश्वर यांच्या एका वक्तव्याने कर्नाटकमध्ये सत्ता संघर्ष कायम राहिल असंच दिसतंय. जी परवेश्वर यांच्या एका वक्तव्याने काँग्रेस-जेडीएसचं सरकार 5 वर्ष टीकणार की नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जी परमेश्वर य़ांनी म्हटलं की, 'असं गरजेचं नाही आहे की एकच व्यक्ती 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल. यावर निर्णय घेणं अजून बाकी आहे की कोणते विभाग कोणाला दिले जातील. कुमारस्वामीच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की आम्हाला ही संधी मिळेल यावर चर्चा होणं अजून बाकी आहे.'

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी य़ांनी यावर उत्तर देतांना म्हटलं की, मला माझ्या भविष्यातली जागा माहित आहे. तुम्ही चिंता करु नका. तुम्ही चिंता का करता. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की अशा प्रकारे कोणतीही चर्चा झालेली नाही. यावर सार्वजनिकपणे मी बोलणार नाही.'

शपथविधी आधी कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं होतं की, 30-30 महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. याआधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी काँग्रेस हा मोठा आणि राष्ट्रीय पक्ष असल्याने योग्य सन्मान मिळाय़ला पाहिजे असं म्हटलं होतं. त्यामुळे आता जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार 5 वर्ष टिकतं की आपसातील वादांमुळे पडतं हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.