नवी दिल्ली : भारताबाहेरून आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहचल्या आहेत. त्यामुळे कोळशाच्या आयातीमध्ये कपात झाली आहे. त्याचा परिणाम कोळशापासून चालणाऱ्या पावर प्लांटवर पडत आहे.
सूत्रांच्या मते कोळशाच्या कमतरतेमुळे दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट घोंगावत आहे. देशातील अनेक भागात यावर्षी मोठा पाऊस झाल्याने कोळसा सप्लाय करण्यात अडचणी येत आहेत. या दोन कारणांमुळे वीज उत्पादन क्षेत्र दुहेरी दबावात आहे. कोळसा आधारीत वीज संयंत्र आपल्या क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती करीत आहेत.
कोळसा न मिळाल्याने वीज उत्पादनावर परिणाम
सूत्रांच्या मते, देशात या वर्षी कोळशाचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. परंतु उशीरापर्यंत सक्रिय राहिलेल्या मान्सूनमुळे कोळसा खदानींमधून ते पावर प्लांटपर्यंत कोळशाच्या पूरेसा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये वीज उत्पादनात अडचणी येत आहेत.
अनेक पावर प्लांट्स आणि वीज वितरण कंपन्यांकडे 2 दिवस पूरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने ग्राहकांना वीज कपातीचा सामना करावा लागू शकतो. अशा सूचना वीज वितरण कंपन्यांकडून देण्यात आल्या आहेत.
गुजरातला 1850, पंजाबला 475, राजस्थानला 380, महाराष्ट्रला 760 आणि हरियाणाला 380 मेगावॅट वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पावरने गुजरातच्या मुंद्रामध्ये आयात होणाऱ्या कोळशावर आधारीत पावर प्लांट बंद केला आहे.अडाणी पावरचे मुंद्रा युनिट देखील बंद करण्यात आले आहे.