पंजाबमध्ये मोठं राजकीय संकट, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग, कॅप्टन अमरिंदर सिंग पायउतार....राजीनाम्याआधी सोनिया गांधींकडे नाराजी व्यक्त

Updated: Sep 18, 2021, 04:55 PM IST
पंजाबमध्ये मोठं राजकीय संकट, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा title=

पंजाब: गुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पंजाबच्या राजकारणात भूकंप येणार का? असा प्रश्न आता सर्वांसमोर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कोण होणार पंजाबचा मुख्यमंत्री?
नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्या खांद्यावर द्यावी अशी मागणी अनेकांनी केल्यानं त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. आज सुनील जाखड यांनी एक ट्विट केले. ज्यात त्यांनी लिहिले, 'पंजाब काँग्रेस वाद मिटवण्यासाठी राहुल गांधींनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित आहेत. 

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि दोन्ही केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश राय चौधरी चंदीगडला पोहोचले आहेत. पंजाबमध्ये राजकीय घ़डामोडींना वेग आला आहे. नवे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या घटनांवरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचं जहाज बुडण्याच्या स्थितीत आहे तर कुठे हेलकावे खात आहे. त्यामुळे काँग्रेसची अशी अवस्था झाल्याचं हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी म्हटलं आहे.