विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत - पंतप्रधान मोदी

'गेल्या सहा महिन्यांचा कालावधी ऐतिहासिक राहिला. जे काम गेल्या कित्येक वर्षांपासून झालं नाही ते आता झालंय'

Updated: Dec 11, 2019, 11:32 AM IST
विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत - पंतप्रधान मोदी  title=

नवी दिल्ली : आज राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक (Citizenship Amendment Bill 2019) सादर होण्यारपूर्वी दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केलीय. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर पाकिस्तान जी भाषा बोलत आहे तीच भाषा इथले काही पक्षही बोलत आहेत. हे विधेयक थेट जनतेपर्यंत घेऊन जा... या विधेयकांना ज्यांना याची गरज होती अशा अनेकांना दिलासा दिलाय. आपण त्यांच्या आनंदाचा अंदाजाही लावू शकत नाही. 'गेल्या सहा महिन्यांचा कालावधी ऐतिहासिक राहिला. जे काम गेल्या कित्येक वर्षांपासून झालं नाही ते आता झालंय' असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 

कर्नाटकात मिळालेल्या विजयावर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केलाय. विरोधकांचं डिपॉझिटही जप्त करत कर्नाटकात विजय मिळवलेल्या सर्वांचं अभिनंदन, असं म्हणत मोदींनी सर्वांना उभं राहत आणि टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करण्याची विनंती केली. 

दिल्लीत सकाळी ९.३० वाजता भाजपच्या संसदीय दलाची बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यासाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. बैठक जवळपास १०.१५ पर्यंत सुरू राहिली.