नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी अखेर माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक झालीय. राजधानी दिल्लीत तब्बल दोन तास त्यांच्या अटकेचं नाट्य रंगलं. 'कानून के हाथ बहोत लंबे होते है...' या फिल्मी डायलॉगची प्रचिती पुन्हा एकदा आली. तब्बल २८ तास सीबीआय आणि ईडी अशा सरकारी तपास यंत्रणांना गुंगारा देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडीनंतर अखेर अटक करण्यात आली. कायद्यासमोर सगळे समान असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयानं मंगळवारी फेटाळला आणि या नाट्याला सुरूवात झाली. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी तातडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यानच्या काळात चिदंबरम यांच्या विरोधात ईडीनं लुकआऊट नोटीस काढली. सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या खटल्याचं कारण देत याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेण्याचं ठरवलं. न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यानं चिदंबरम गायब झाले. ईडीपाठोपाठ सीबीआयनंही त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली.
तब्बल २७ तास सीबीआय आणि ईडीला गुंगारा देण्यात यशस्वी झालेले, 'बेपत्ता' चिदंबरम बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास थेट दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात प्रकटले. आयएनएक्स प्रकरणात आपण कधीही आरोपी नव्हतो. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, असं सांगत चिदंबरम यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला. तपास यंत्रणांनी कायद्याचा सन्मान राखावा, असंही ते म्हणाले.
चिदंबरम काँग्रेस मुख्यालयात असल्याची खबर मिळताच सीबीआयचं पथक तत्काळ तिथं पोहोचलं. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची वाट अडवून धरली. पुन्हा एकदा सीबीआयला गुंगारा देऊन, चिदंबरम जोरबाग येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. चिदंबरम आणि सीबीआय यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. सीबीआयचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं, मात्र घराचा दरवाजा उघडण्यात येत नव्हता. तेव्हा सीबीआय अधिकाऱ्यांनी गेटवरून उड्या मारून घरात प्रवेश केला. तब्बल तासभर त्यांची घरातच चौकशी सुरू झाली. एव्हाना बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्लागुल्ला सुरू केला. या सगळ्यांना पांगवताना दिल्ली पोलिसांना कष्ट घ्यावे लागले. दरम्यान ईडीची टीमही जोरबाग इथल्या घरी पोहोचली. अखेर रात्री पावणे दहाच्या सुमारास चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केली... आणि त्यांची रवानगी चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात केली.