Goa News : गोवा सरकार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. नोकरी भरतीत भष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लर्कच्या पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि फतोर्दाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. भरती प्रक्रियेवेळी कॅश फॉर जॉबच्या नावाखाली हा घोटाळा झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
दक्षिण गोवा कलेक्ट्रेटमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कच्या पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऑक्टोबर 2023मध्ये दक्षिण गोवा कलेक्ट्रेटमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. भरती प्रक्रियेवेळीच उमेदवारांकडून नोकरी देण्याच्या बदल्यात लाच मागण्यात आली होती. भाजपने या भरतीत मोठा भ्रष्टाचार करत पद विकल्या आरोप विजय सरदेसाई यांनीन केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
दक्षिण गोवा कलेक्ट्रेटमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी ऑक्टोबर 2023मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये उमेदवारांची कौशल्य परीक्षा घेण्यात आली होती. सात महिन्याच्या प्रक्रियेनंतरही या परिक्षांचे निकाल प्रलंबित ठेवले होते. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियाच संशयास्पद असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.
एका महिलेमार्फत या पदांचा घोटाळा करण्यात आला आहे. एक महिला परीक्षा देणाऱ्या उमेदवारांशी संपर्क साधून पैसे देणाऱ्या उमेदवांराना पात्र ठरवून नोकरी दिली जाईल अशा प्रकारचा संवाद साधायची. अशा प्रकारे पैसे देणाऱ्या उमेदवारांनाच नोकरी दिली जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. नोकर भरतीतील या सर्व घोटाळ्याची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील सरदेसाई यांनी केली आहे.