बजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास

भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय. आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात... 

Updated: Jan 31, 2019, 10:44 AM IST
बजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास title=

मुंबई : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी तो तयार करण्यासाठी अनेक जण मेहनत घेत असतात. ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जातो त्यादिवशी सर्वसामान्यांपासून मोठ-मोठ्या उद्योगपतींचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आणि त्यात केल्या जाणाऱ्या विविध घोषणांकडे लागलेलं असतं. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांना तासाहून अधिक वेळ सहजच लागतो. अर्थमंत्र्यांच्या भाषणासोबतच ज्या सुटकेसमधून या अर्थसंकल्पाची कागदपत्रं ते संसदेत घेऊन येतात ती लाल रंगाची सुटकेसही खास असते. गेल्या १५९ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजतागायत सुरूच आहे. या परंपरेमागील काही खास गोष्टी जाणून घ्यायला नक्कीच तुम्हालाही आवडेल...

१८६० सालापासून सिलसिला सुरूच

वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याची संकल्पना ही मुळात ब्रिटिशांची... अर्थसंकल्प आणि अर्थमंत्र्याच्या लाल सुटकेसचे गणित १८६० पासून सुरू आहे. १८६० साली ब्रिटनचे 'चान्सलर ऑफ द एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन' यांनी लेदर बॅगेतून पहिल्यांदा आर्थिक लोखा-जोखा आणला होता. तेव्हापासूनच या प्रथेला सुरुवात झाली. ब्रिटनच्या राणीने स्वतःहून ग्लॅडस्टनला ही खास सूटकेस गिफ्ट दिली होती. त्यामुळेच ब्रिटीश चान्सलर ग्लॅडस्टोन यांनी लाकडी बॅगेवर लाल रंगाचे लेदर लावले होते आणि त्यावर महाराणी व्हिक्टोरियाचं मोनोग्राम लावलं होतं... त्यानंतर नकळत लाल सुटकेसचा पायंडाच पडला.

ब्रिटनमध्ये ग्लॅडस्टन यांचा लाल रंगाचा बजेट बॉक्स २०१० पर्यंत वापरला जात होता. २०१० साली तो म्युझियमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर एक नवा लाल लेदर बजेट बॉक्स वापरण्यास सुरुवात झाली. ब्रिटनशिवाय युगांडा, झिम्बॉम्वे आणि मलेशियामध्येही अशाच ब्रिफकेस वापरल्या जातात.

'बजेट' हा शब्द नेमका आला कुठून?

१७३३ साली ब्रिटनमध्ये अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल लेदर बॅग घेऊन अर्थसंकल्प मांडायला सुरूवात केली. लेदर बॅगेला फ्रेंच भाषेत 'बोजोट' किंवा 'बुगेट' असं म्हटलं जातं. त्याचा अपभ्रंश होऊन 'बजेट' हा शब्द आला. त्यानंतर अनेकांनी देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्याच्या प्रक्रियेला 'बजेट' हेच नाव दिलं.  

प्रत्येक वर्षी बदलते सुटकेस

२६ नोव्हेंबर १९४७ रोजी भारतात स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी, अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी पहिल्यांदाच स्वतंत्र भारताच्या संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला होता. जसे ब्रिटनमध्ये २०१० पर्यंत एकच बॅग वापरली जात होती तशीच भारतामध्येही षण्मुखम यांची सुटकेस बॅग वापरली जाते. परंतु बजेटचे डॉक्युमेंट्स आणण्यासाठी अर्थमंत्री प्रत्येक वेळी नवी सुटकेस वापरतात. लाल रंगामधील शेडची बॅग यासाठी वापरली जाते. भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय... आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात...

१९४७-४९ आर के षन्मुखम चेट्टी

१९४९-५० जॉन मथाई

१९५०-५७ सी डी देशमुख

१९५८-६३ मोरारजी देसाई

१९६३-६५ टी टी कृष्णमचारी

१९६५-६७ सचिंद्र चौधरी

१९६७-६९ मोरारजी देसाई

१९७१-७५ यशवंतराव चव्हाण

१९७५-७७ चिदम्बरम सुब्रहमयम

१९७७-७९ हरिभाई एम पटेल

१९८०-८२ आर वेंकटरमण

१९८२-८४ प्रणब मुखर्जी

१९८४-८७ वी पी सिंह

१९८७-८८ एन डी तिवारी

१९८७ राजीव गांधी

१९८८-८९ शंकरराव चव्हाण

१९८९-९० मधु दंडवते

१९९०-९१ यशवंत सिंह

१९९१-९६ मनमोहन सिंह

१९९७-९८ पी चिदम्बरम

१९९९-२००१ यशवंत सिन्हा

२००३-०४ यशवंत सिन्हा

२००५-०८ पी चिदंबरम

२००९-१२ प्रणब मुखर्जी

२०१२-१४ पी चिदम्बरम

२०१४-१८ अरुण जेटली

२०१९ पीयूष गोयल

यंदा म्हणजेच २०१९ साली वैद्यकीय उपचारांसाठी अर्थमंत्री अरुण जेटली सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या स्थितीत काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्र्यांचा कार्यभार रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. पियूष गोयल हेच लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणाचे वाचन करतील.