महाआघाडीचे सरकार आले तर दररोज पंतप्रधान बदलतील- अमित शहा

रविवारी संपूर्ण देशालाच सुट्टी असेल.

Updated: Jan 30, 2019, 03:52 PM IST
महाआघाडीचे सरकार आले तर दररोज पंतप्रधान बदलतील- अमित शहा title=

कानपूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ते बुधवारी कानपूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जर देशात महाआघाडीची सत्ता आली तर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा, शनिवारी स्टॅलिन अशाप्रकारे दररोज पंतप्रधान बदलावा लागेल. यानंतर रविवारी संपूर्ण देशालाच सुट्टी असेल, अशा शब्दांत अमित शहा यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. 

काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या सभेत विरोधकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. या सभेला जवळपास २० विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वांनी आगामी निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार व्यक्त केला होता. विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली एकटवण्यास नकार दिला असला तरी राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर विरोधी पक्षांनी एकत्रपणे लढण्याची महाआघाडीची रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा यांनी दोन पक्षांनी युती केली होती. यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपच्या गोटातील चिंता वाढल्या आहेत.

'भाजपा कट्टरतेवर उतरली तर निवडणुकीआधी धार्मिक दंगली घडतील'

यानंतर भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेशसह हिंदी पट्ट्यात भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भाजपने ईशान्य भारतातील राज्यांमधून हे नुकसान भरून काढण्यासाठी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल त्रिशंकू असल्यास भाजपसाठी मित्रपक्षांची मोट बांधणे मोठे जिकीरीचे ठरणार आहे.