अखेरचा सॅल्युट! सीडीएस जनरल बिपीन रावत अनंतात विलीन

दोन मुलींनी कायमचा गमावला आधार 

Updated: Dec 10, 2021, 05:08 PM IST
अखेरचा सॅल्युट! सीडीएस जनरल बिपीन रावत अनंतात विलीन  title=

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर भागात बुधवारी एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल रावत यांचं निधन झालं. अतिशय भीषण स्वरुपातील या अपघातामध्ये जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर काही अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढावला. 14 पैकी 13 जणांचे प्राण या अपघातानं घेतले. 

संरक्षण दलप्रमुख रावत यांच्या निधनाचं वृत्त म्हणजे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला आणि सबंध देशाला हादरवणारं होतं. (CDS General Bipin Rawat)

शुक्रवारी ब्रार स्क्वेअर येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल रावत यांच्या मुलींनी सर्व अंत्यसंस्काराचे विधी करत त्यांना मुखाग्नी दिला आणि जनरल यांच्यासह त्यांच्या पत्नी अनंतात विलीन झाल्या. या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या इतर सैन्यदल अधिकाऱ्यांवरही त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जनरल रावत यांची आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांची अंत्ययात्रा सुरु झाली तो क्षण अंगावर काटा आणणारा होता. गन कॅरिएजमधून त्यांचं पार्थिव अंतिम स्थानी नेण्यात आलं. 

आर्मी बँडनं धुन छेड जनरल रावत यांना आदरांजली देण्यास सुरुवात केली. तर, सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करत या वीर पुत्राला निरोप दिला. 

सलामी शस्त्र, बँड, पथसंचलन या सर्व गोष्टींचा आणि 17 तोफांच्या सलामीचा मान यावेळी जनरल रावत यांना देण्यात आला. 

तिरंग्यामध्ये असणारं त्यांचं पार्थिव देशसेवा सार्थकी लागल्याचीच अनुभूती सर्वांना देत होतं. त्याचवेळी एका पर्वाचा असा दुर्दैवी अंत होणं ही भावना सर्वांच्या काळजाला पाझर फोडत होती. देशप्रेमाचं एक वेगळं रुप यावेळी पाहायला मिळालं. अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनीही यावेळी जनरल रावत यांना आदरांजली वाहत पुष्पचक्र अर्पण केलं.

मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला.... 

दोन मुलींना मागे ठेवत जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीनं या जगाचा निरोप घेतला ही बाब सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. 

वडिलांचं पार्थिव पहिल्यांदाच समोर पाहिल्यानंतर त्यांची मुलगी नि:शब्द झाली होती. ही दृश्य साऱ्या देशाला दु:ख देणारी होती.