नवी दिल्ली: भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्याच झाली, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. तसेच या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सुरुवातीला भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केली असे सांगितले जात होते. मात्र, अलीकडच्या काळातील त्यांच्या अनेक शिष्यगणांनी याबाबत शंका व्यक्त केली. भय्यूजी महाराज आत्महत्या करणारच नाहीत, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या शिष्यांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आम्ही या मागणीचा जरुर विचार करु, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.
भय्यूजी महाराज यांनी १२ जूनला त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. भय्यूजी महाराज आत्महत्याप्रकरणात अलीकडच्या काळात नवीन माहिती समोर आली होती. त्यांची पत्नी आणि मुलीने पोलिसांकडे संशयित सेवक आणि इतर काही लोकांवर कारवाईची मागणी केली होती. तसेच कलम १६४ अंतर्गत भय्यूजी महाराजांच्या ड्रायव्हरचा जबाबही नोंदवण्यात यावा, असे दोघींनी म्हटले होते. भय्यूजी महाराजांचा ड्रायव्हर कैलाश पाटीलला या सगळ्या षडयंत्रांची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका युवतीने रचलेल्या कारस्थानाविषयी पोलिसांना सांगितले होते. मात्र, भविष्यात त्याने हा जबाब बदलू नये, यासाठी न्यायालयासमोर त्याचा जबाब नोंदवून घ्यावा, असे भय्यूजी महाराजांच्या पत्नी व मुलीने म्हटले होते.