भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी सेवक विनायक पोलिसांच्या ताब्यात

विनायकच्या चौकशीत काय निष्पन्न होतंय ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated: Dec 28, 2018, 11:06 PM IST
भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी सेवक विनायक पोलिसांच्या ताब्यात title=

इंदूर : भैय्यू महाराज यांच्या आत्महत्ये प्रकरणी भैय्यूजी महाराजांचा सेवक विनायकला इंदूर पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.  तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी भैय्यूजी महाराज्यांच्या सेवेकऱ्यांचा जबाब पुन्हा नोंदवून घेतला. या अंतर्गत महाराष्ट्रतून आलेल्या पाच सेवेकऱ्यांचा जबाब, इंदूर जिल्ह्यातल्या आझाद नगर पोलिसांनी नोंदवला आहे. यासोबतच पोलिसांनी भैय्यूजी महाराजांच्या फोनची कॉल डिटेल तपासणीचे कामही सुरु करण्यात आले आहे. माझ्या सर्व आश्रम आणि त्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल, असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले होते. हाच धागा पकडत पोलिसांनी विनायकला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. विनायकच्या चौकशीत काय निष्पन्न होतंय ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चर्चेला उधाण

आत्महत्या ही कौटुंबिक कलहातून केल्याचे बोलले जात असताना आपले सर्व व्यवहार सेवकाकडे देऊन या चर्चेला आणखीनच तोंड फुटले. 'माझ्या सर्व आश्रम आणि त्याच्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल,' असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले आहे. भैय्यू महाराजांनी सर्व व्यवहार कुटुंबाकडे सुपूर्त न करता सेवकाकडे देण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. भैयू महाराजांच्या आत्महत्येनंतरही हा प्रश्न निरुत्तरीत होता.

आश्रमाचा कारभार 

आश्रमाच्या दर्शनी भागापासून ते सर्वत्र भय्यूजी महाराजांची प्रसन्न मुद्रा पाहायला मिळते. पण एका कोपऱ्यात पडलेला चपलांचा रिकामा स्टँड आश्रमाची आजची परिस्थिती स्पष्ट करतो. आश्रमाच्या बाहेर भय्यूजी महाराजांनी लोकांच्या सेवेसाठी सुरु केलेल्या रुग्णवाहिका आज वापराविना धूळ खात उभ्या आहेत. आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सेवेकरी शिल्लक राहिलेत. ते आपापल्या परीनं आश्रमाचा दैनंदिन कारभार ढकलतात.