पटना : बिहारमधील खगरियामधून एक रोचक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीच्या खात्यात चुकून 5.50 लाख रुपये जमा झाले. मोदी सरकारकडून मदत मिळाली असा विचार करून त्या व्यक्तीने पैसे खर्चही केले. बँक अधिकाऱ्यांना त्यांची चूक कळल्यावर त्यांनी त्या माणसाला पैसे परत करण्यास सांगितले. पण त्या माणसाने पैसे परत करण्यास नकार दिला. बँक अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला तुरुंगात पाठवले.
वास्तविक, बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे, खगरियाच्या मानसी ब्लॉकच्या बख्तियारपूर ग्रामीण बँक शाखेच्या खातेदाराच्या खात्यात 5.50 लाख रुपये पाठवण्यात आले. खातेदार रणजीत कुमार दास आपल्या खात्यात पैसे पाहून खूश झाले. सरकारकडून मदत मिळाली असे समजून त्याने ते पैसे खर्च केले.
बँकेला पैसे परत करण्यास नकार
बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची चूक कळल्यावर त्यांची झोप उडाली. त्यांनी रणजीतला बँकेचे पैसे परत करण्यास सांगितले. यावर रणजीत म्हणाला, हा पैसा मोदी सरकारने पाठवला आहे, त्यामुळे तो परत करणार नाही. यानंतर, ग्रामीण बँकेच्या बख्तियारपूर शाखेने रणजितच्या नावाने नोटीस पाठवले. असे असूनही रणजितने पैसे परत केले नाहीत.
यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी रणजीतवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रणजीतला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कळले आहे की, रणजीतच्या खात्यात 5.50 लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्याने ते पैसे खर्च केले.