नवीन संशोधन आलं समोर, या लोकांना कोरोना होण्याचा धोका अधिक

दररोज कोरोनाबाबत नवीन संशोधन पुढे येत असतं.

Updated: Jun 6, 2020, 03:32 PM IST
नवीन संशोधन आलं समोर, या लोकांना कोरोना होण्याचा धोका अधिक title=

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु असताना अनेक देशांमध्ये लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोणतीही लस अजून मिळालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ यावर लस शोधण्याच्या कामात गुंतले आहेत. कोरोना कोणाला होऊ शकतो किंवा कोणाला होऊ शकत नाही याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण जगभरातील शास्त्रज्ञ यावर अभ्यास करुन वेगवेगळे शोध घेत आहेत. त्यातच आता आणखी एक गोष्ट अशी समोर आली आहे की, टक्कल पडलेल्या लोकांना कोरोनाची लागण लवकर होऊ शकते. 

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, टक्कल झालेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा धोका जास्त असतो आणि त्यांच्या मृत्यूची शक्यताही जास्त असू शकते. कारण केस गळण्यासाठी एंड्रोजन हार्मोन्स जबाबदार आहेत. कोरोना विषाणूच्या बर्‍याच गंभीर प्रकरणांमध्ये या संप्रेरकाची जोड सापडली आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि संशोधन प्रमुख कार्लोस वॅम्बीयर यांनी ब्रिटीश टेलिग्राफला सांगितले की, टक्कल पडणे कोरोनाचा गंभीर धोका दर्शवू शकेल. यापूर्वी आकडेवारीवरून हे उघड झाले होते की कोरोनामुळे आजारी पडलेल्या पुरुषांच्या मृत्यूची शक्यता महिलांपेक्षा जास्त आहे.

प्रोफेसर वॅम्बीयर म्हणाले की, आम्हाला वाटते की अँड्रोजन शरीरात व्हायरसच्या प्रवेशासाठी प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. स्पेनमध्ये त्यांनी २ रुग्णांमध्ये याचा अभ्यास केला. दोघांमध्येही हे उघड झाले की टक्कल पडलेल्या माणसांचे प्रमाण रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना पीडित लोकांमध्ये जास्त आहे.

मैड्रिडच्या तीन रुग्णालयात दाखल झालेल्या १२२ रुग्णांवर केलेल्या अभ्यासात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये ७९ टक्के रुग्णांचं टक्कल पडलं होतं. हा अभ्यास अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

स्पेनमध्ये झालेल्या दुसर्‍या अभ्यासात ४१ रुग्णांमध्ये करण्यात आलेल्या परिक्षणात असे दिसून आले आहे की, कोरोना रुग्णांमध्ये ७१ टक्के लोकं हे टक्कल पडलेले होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी टक्कल असलेल्या लोकांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.