UP Election Result 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यात सत्ता मिळवत भाजपने (BJP) आपलं वर्चस्व पुन्हा एका सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचं (Congress) उरलं सुरलेलं अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
तर गेल्या निवडणुकीत सत्ता असलेल्या पंजाबमध्येही काँग्रेसला सत्तेवर पाणी सोडावं लागलं आहे. पंजाब काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला पण त्यांच्या खात्यात होत्या अवघ्या 18 जागा. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि पडद्यामागून काम करणाऱ्या टीमसाठी हा मोठा धक्का होता.
काँग्रेसचे प्रभारी अपयशी
के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला हे निवडणुक झालेल्या राज्यांचे प्रभारी होते. पण तेही या राज्यांना वाचवू शकले नाहीत. ज्या पंजाबमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, तेही आता काँग्रेसच्या हातून निसटलं आहे. देशात आता केवळ दोन राज्यात काँग्रेसची सत्ता उरली आहे.
उत्तराखंडमध्ये परंपरा मोडली
उत्तराखंडच्या स्थापनेपासून आतापर्यंत इथे दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. पण काँग्रेसला ही परंपरा कायम राखता आली नाही. भाजपने इथे पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन केली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्षात दुफळी माजण्यांच प्रमुख कारण ठरल ते पक्षातील दुफळी. इथं पक्ष दोन भागात विभागला गेला, जे एकत्र काम करायला तयार नाहीत.
गोव्यातही सत्ता गेली
गोव्यात, राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव, गिरीश चोडणकर (प्रदेशाध्यक्ष) आणि दिगंबर कामत (माजी मुख्यमंत्री) या त्रिकुटाने लुइझिन्हो फालेरोसारख्या राज्य नेत्यांकडे दुर्लक्ष केल. तर फ्रांसिस्को सरडीन्हासारख्या नेत्यांना बाजूला केलं. वरिष्ठ निरीक्षक गोव्यात योग्य उमेदवार देण्यात अपयशी ठरले. याचे परिणाम गोव्यात काँग्रेसला भोगावे लागले.
पंजाबमध्ये आपचा काँग्रेसला 'दे धक्का'
राहुल आणि प्रियंका यांनी पंजाबमध्ये केलेल्या प्रयोगाचे अपेक्षित परिणाम झाले नाहीत. चरणजितसिंग चन्नी यांना अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री बनवण्यात पक्षाने शेवटच्या क्षणी खेळलेल्या जुगाराचा काहीही परिणाम झाला नाही. निवडणूक प्रचारादरम्यान अजय माकन आणि हरीश चौधरी यांनी पक्षाच्या खासदारांकडे दुर्लक्ष करून पक्षाची परिस्थिती बिघडवली, त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे.