शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेले अभिमन्यू पवार हे देखील भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तयारी केली आहे. मुळात गेल्या ०६ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडे असलेल्या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकासाठी भाजपाने दावा केलाय. जागांच्या वादामुळे युतीच्या घोषणा लांबली त्यापैकी औसा हा मतदारसंघ असल्याचेही बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी राज्यातील मंत्री, सत्ताधारी-विरोधी पक्ष नेते, अधिकारी हे ज्यांच्याकडे विनंती करून वेळ मागत असतात ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून ते मुख्यमंत्र्यांचे खाजगी स्वीय सहायक असलेले अभिमन्यू हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, त्यानंतर भाजपचे भाजपचे कार्यकर्ते. लातूर जिल्ह्यात भाजयुमोच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचं काम केलंय. २०१४ च्या निवडणुकीत भाजप नेते ओम माथूर-देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं. पुढे भाजपची सत्ता आली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरूनच आपण मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक झाल्याचे अभिमन्यू पवार सांगतात.
मूळ भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला वाटतं त्याप्रमाणे त्यांनाही आमदार व्हावं असं वाटलं. मनातील इच्छा मुख्यमंत्र्यांमुळे जवळ बोललो. आणि साहेबानी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा येथून आपण तयारीला लागल्याचे ते सांगतात.
गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो. दिनकर माने यांच्या रूपाने औसाने दोनदा शिवसेनेचा आमदार निवडून दिलाय. मात्र गेल्या ०२ विधानसभेत ते सलग दोनदा पराभूत झालेत. त्यामुळे आता भाकरी फिरवावी लागेल असे म्हणत अभिमन्यू पवार यांनी औसावर भाजपचा दावा सांगितलाय. औसा हे पूर्वीपासून भाजपची ताकद असलेला तालुका असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आपण इथून उमेदवारी मागितल्याचे ते सांगतात. मात्र शिवसेना नेते अद्यापही या जागेवर ठाम आहेत.
महाराष्ट्रातील ज्या ०५ वादग्रस्त जागांमुळे युतीच्या घोषणेला उशीर झाला त्यापैकी एक औसाची जागा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच अभिमन्यू पवार यांच्यासाठी युतीवरच एक प्रकार टांगती तलवार ठेवल्याचेही बोललं जातं. मात्र अभिमन्यू पवार यांच्याशिवाय भाजप नेते तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे सभापती बजरंग जाधव हे ही भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे सीएमचे पीए असलेल्या अभिमन्यू पवार यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता त्यांची लढत होणार आहे. सलग दोन वेळेस औसा येथून काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासोबत. त्यामुळे एक अनुभवी आमदार विरुद्ध भाजपचे संभाव्य नवखे उमेदवार असलेल्या अभिमन्यू पवार यांच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.