नवी दिल्ली : तीन राज्यांमधील पराभवानंतर भाजपाचं आत्मचिंतन सुरू झालंय. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक बोलावलीय. या बैठकीला सर्वांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही बैठक दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात होणार आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणूकीतील पराभवानंतर खचून जाऊ नये तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासंदर्भात अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसदीय दलाच्या बैठकीत भाजपच्या खासदारांना संबोधित करणार आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत. भाजप संसदीय दलाची बैठक सकाळी होणार आहे.
आरबीआय - सरकारमधील वाद, राफेल, कावेरी मुद्द्यावरून विरोधकांनी तर राम मंदिर मुद्द्यांवरून मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप खासदारांना कोणता संदेश देतात हे पाहावं लागणार आहे.