GST वाढवल्याने पहिला फटका, Amul च्या या वस्तू महागल्या

अमूलच्या उत्पादनांच्या दरात वाढ झाली आहे. पाहा कोणत्या वस्तू यामुळे आणखी महागल्या आहेत.

Updated: Jul 19, 2022, 09:00 PM IST
GST वाढवल्याने पहिला फटका, Amul च्या या वस्तू महागल्या title=

मुंबई : सरकारने आता काही गोष्टींवर सोमवारपासून 5 टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे आता याचा परिणाम सगळ्यांच्याच खिशावर होताना दिसत आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंवर हा कर लागू करण्यात आला आहे. यामध्ये पॅकेज्ड वस्तूंचा ही समावेश आहे. अनेक जण अमूल कंपनीचेच उत्पादने वापरतात. त्यामुळे आता अशा लोकांचा खिशा आणखी मोकळा होणार आहे.

18 जुलैपासून जीएसटीचे दर वाढवले ​​असून त्याचा परिणाम म्हणून आता अमूलने आपल्या काही वस्तूंच्या दरात वाढ केली आहे. भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपनी (Amul Dairy) ने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. या नवीन किंमती 19 जुलैपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. 

पॅकेज्ड डेअरी उत्पादनांवर 5% जीएसटी लागू केल्यानंतर अमूलने हा निर्णय घेतला आहे. अमूलने दही, मठ्ठा, फ्लेवर्ड दुधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ केली आहे.

प्रथमच जीएसटीच्या कक्षेत

सरकारने पहिल्यांदाच दुधाचे पॅकेज केलेले पदार्थ – दही, लस्सी, पनीर आणि ताक यांचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला आहे. या उत्पादनांवर पाच टक्के दराने जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे अमूलने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. आगामी काळात आणखी डेअरी कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात.

200 ग्रॅम कप दह्याची किंमत 20 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आली आहे. 400 ग्रॅम दहीचा कप आता 40 रुपयांऐवजी 42 रुपयांना मिळणार आहे. अमूलचे दही पॅकेट आता 30 रुपयांऐवजी 32 रुपयांना मिळणार आहे.

तुम्हाला एक किलोचे दह्याचे पॅकेट घेण्यासाठी 69 रुपये खर्च करावे लागतील. यापूर्वी त्याची किंमत 65 रुपये होती.ृअमूलची 170 मिलीची लस्सी आता 10 रुपयांऐवजी 11 रुपयांना मिळणार आहे.

अमूलची फ्लेवर्ड दुधाची बाटली आता 20 रुपयांऐवजी 22 रुपयांना मिळणार आहे. टेट्रा पॅकसह ताक 200 मिली पॅकेट 12 रुपयांऐवजी 13 रुपयांना मिळणार आहे. मात्र, 200 ग्रॅम लस्सीच्या कपच्या किमतीत वाढ झालेली नाही. पूर्वीप्रमाणे, ते केवळ 15 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

जीएसटीमुळे भाव वाढले

अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोधी म्हणाले की, जीएसटी वाढल्यामुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जूनच्या अखेरीस GST परिषदेची 47 वी बैठक झाली. बैठकीत, जीएसटी परिषदेने या कर स्लॅबच्या बाहेर ठेवलेल्या काही खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला.