नवी दिल्ली : जगातील सर्वात मठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे. बेजोस यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत हा बहूमान मिळवला.
फोर्ब्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार अमेझॉनच्या भागिदारीमध्ये २ टक्क्यांची वाढ झाल्याने बेजोस यांच्या संपत्तीत तब्बल ९० कोटी डॉलर्सचा नफा झाला. त्यामुळे त्यांच्या संपत्तीने ९०.६ अरब डॉलर्सचा टप्पा पार केला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी या आधी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांना पाठिमागे टाकले. बिल गेट्स यांची एकूण संपत्ती ९०.१ अरब डॉलर्स इतकी आहे.
बेजोस यांनी अमेरिकेतील सर्वात मोठी ग्रोसरी चेन व्होल फूड्स ही कंपनी नुकतीच खरेदी केली होती. हा व्यवहार पक्का झाल्यावर बेजोस यांनी एकाच झटक्यात १३,००० कोटी रूपये (२ अरब डॉलर) कमावले. दरम्यान, बेजोस यांनी गेट्स यांना मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही जुलैमध्ये असे घडले होते. बेजोस यांनी गेट्सल यांना मागे टाकले होते. मात्र, तेव्हा काही तासांमध्येच बिल गेट्स यांनी पुन्हा मजल मारत बेजोस यांना पाठिमागे टाकले. २७ जुलैला अॅमेझॉनचे शेअर्स वाढल्यानंतर बेजोस यांची संपत्ती ९०.६ बिलियन डॉलर्सवर पोहोचली. दिवसभरातील आर्थिक चडउतारानंतर बिल गेट्स पुन्हा एकदा टॉपला पोहोचले होते.
दरम्यान, बेजोस यांनी ६ महिन्यांपूर्वी अमानसियो ऑर्टेगा आणि वॉरन बफेट यांनाही पाठिमागे टाकले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले होते.