नवी दिल्ली: जेट एअरवेजने बुधवारी मध्यरात्रीपासून आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर जेट एअरवेजची सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित होणार आहेत. जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प होणार आहे. गेल्या डिसेंबरपासून जेट एअरवेजच्या विमानांच्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली होती.
जेटच्या १२३ विमानांच्या ताफ्यापैकी केवळ पाचच विमाने कार्यरत होती. याशिवाय, जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच ठप्प झाली आहेत. कंपनीत स्टेट बँकेने हिस्सा वाढविताना, १,५०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचे जाहीर केल्यापासून मात्र प्रत्यक्षात ३०० कोटींचाच वित्तपुरवठा झाल्याने जेटची देशांतर्गत उड्डाणांची संख्या दिवसागणिक कमी होत आली आहे. सुरुवातीला पूर्वेत्तर भारत तर नंतरच्या टप्प्यात दक्षिणेतील उड्डाणे कमी करण्यात आली होती. मध्यंतरी देणी थकल्याबद्दल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जेटचा तीन वेळा इंधनपुरवठाही खंडित केला होता.
All jet airways flight, domestic and international, cancelled with immediate effect. The last flight will operate today. pic.twitter.com/RKavcKioSw
— ANI (@ANI) April 17, 2019
जेटच्या सर्व आशा स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या बँकांच्या समूहावर एकटवल्या होत्या. या बँकांकडून ४०० कोटींचा निधी मिळण्याची अपेक्षा जेटला होती. मात्र, ती फोल ठरली. जेट एअरवेज ही मे २०१४ पासून बंद पडलेली सातवी भारतीय विमान कंपनी ठरली आहे. जेट एअरवेज संकटात सापडल्यानं २० हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आंदोलन केले होते.
कंपनीच्या ताफ्यातील भाडय़ाची विमाने घेण्यासाठी स्पर्धक स्पाईस जेटने उत्सुकता दर्शविली आहे. तर अन्य स्पर्धक इंडिगोने देशांतर्गत उड्डाणांची संख्या गेल्या काही दिवसात वाढविली आहे.