Al Nino Effects On Monsoon : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास अतिशय सकारात्मक वेगानं सुरु असतानाच आता चिंता वाढवणारी माहिती भारतीय हवामान खात्यानं दिल्याचं म्हटलं जात आहे. नाही म्हणता म्हणता यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव असेल असा इशारा IMD कडून देण्यात आला आहे. ज्यामुळं यंदाच्या वर्षी सामन्य असणारा मान्सून त्याहीपेक्षा कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशात मागील काही महिन्यांमध्ये सातत्यानं बदलणारं हवामान पाहता यंदाच्या मान्सूनवर आणि कृषी क्षेत्रावर अल निनो नकारात्मक परिणाम करताना दिसेल. मागील चार वर्षांमध्ये समाधानकारक असणारं पर्जन्यमान यंदा मात्र या प्रभावामुळं खंडीत होऊ शकतं.
आकडेवारीच्या अनुषंगाने अल निनोकडे पाहता श्वेता सैनी आणि अशोक गुलाटी यांच्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 14 वर्षे म्हणजेच 1950 ते 2013 हा काळ दुष्काळाचा असून, त्यामधील 11 वर्षे अल निनोचा प्रभाव पाहायला मिळाला होता. IMD नं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी सरासरीच्या 96 टक्के म्हणजेच सामान्य पाऊस असला तरीही त्यावर अल निनोचा प्रभाव नाकारता येत नाही. ज्यामुळं शासनाकडूनही हवामानाच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
उच्चारताच काहीही कल्पना न येणाऱ्या या शब्दाचा स्पॅनिश भाषेतील अर्थ होतो, लहान मुलगा. ही व्याख्या अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळचा पूर्व पॅसिफिक महासागर आणि ऑस्ट्रेलिया- इंडोनेशियाजवळ असणापा पश्चिम पॅसिफिक महासागर येथील हवामान बदलांच्या स्थितीशी जोडला गेला आहे. ज्याचे थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पॅसिफिक महासागरात दबावाचं अंतर वाढल्यास त्यामुळं भारतीय मान्सूनमध्य आर्द्रतेचं प्रमाण कमीजास्त दिसून येतं. परिणामी कमी दाबाच्या वाऱ्यांचा वेग मंदावतो आणि पावसाचं प्रमाण घटतं. अल निनोचा फक्त भारतीय मान्सूनवरच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील इतर काही भागांमध्येही परिणाम पडू शकतो.
अल निनोचा प्रभाव नेमका किती असेल याबाबत अद्यापही साशंकता आणि मतभिन्नता पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही देशाची बहुतांश अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळं शेतकऱ्यांनी भविष्यातील स्थितीला अनुसरून तयार रहावं असं आवाहनही करण्यात येत आहे.