8 Year Old Girl Dies After Dog Bites: भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वाघ-बकरी चहाच्या मालकाचा भटक्या कुत्र्यामुळं मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेश येथील आग्रातून अशीच एक धक्कादायक घटना समोर येतेय. एका 8 वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. जवळपास आठवड्याभरापूर्वी मुलीला कुत्रा चावला होता.
8 वर्षांची चिमुकली किराणा दुकानात जात असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर मुलीने लगेचच तिच्या आई-वडिलांना कुत्र्याच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. तरीही तिच्या घरच्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले नाही. डॉक्टरांनी म्हटलं आहे की, कुत्र्याने हल्ला केल्यानंतर मुलीला लगेचच अँटी-रेबीज लस (एआरवी) देण्यात आली नाही. त्यानंतर रविवारी तिची प्रकृती जास्त बिघडली. तेव्हा तिला आरोग्य केंद्रात नेण्यात गेले. मात्र, मुलीची अवस्था नाजूक होती. त्यामुळं डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मुलीच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
मुलीचे वडिल धर्मेंद्र हे एक शेतकरी आहेत. त्यांनी म्हटलं की, आधी आम्हाला वाटलं की कुत्र्याच्या हल्ल्यात मुलीला साधारण जखम असेल त्यामुळं आम्ही फार लक्ष दिलं नाही. काही दिवसांत जखम ठिक होईल, असं आम्हाला वाटलं. काही दिवसांपूर्वीच, आमच्या घराशेजारी असलेल्या एका मुलासोबतही अशीच घटना घडली होती. मात्र आम्ही दुर्लक्ष केले होते. मात्र, अचानक माझ्या मुलीची तब्येत बिघडली तिला ताप आला होता व ती काही बोलण्याच्या मनस्थितीतदेखील नव्हती. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी म्हटलं की, मुलीवर कुत्र्याने हल्ला केल्यानंतर 15 दिवसांनी तिला रुग्णालयात आणण्यात आले. तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरात रेबीजचे संक्रमण झाले होते आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी म्हटलं की, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर तिच्यावर घरातच उपचार करण्यात आले होते. त्यामुळंच मुलीचा मृत्यू झाला आहे. योग्य उपचार न मिळाल्याने तिच्यावर मृत्यू ओढावला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कुत्रा चावल्यावर किंवा कुत्र्याने हल्ला केल्यानंतर 24 तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घ्यावा लागतो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी, सातव्या दिवशी व शेवटचा डोस 28व्या दिवशी घ्यावा लागतो. जर वेळेतच त्यावर उपचार केले नाही तर रेबीजची लागण होऊन संपूर्ण शरीरात त्याचे संक्रमण होते. त्यामुळं मृत्यू होण्याचा धोका असतो. रेबीजची काही स्पष्ट लक्षणे म्हणजे हायड्रोफोबिया (पाण्याची भीती), मान दुखणे आणि उलट्या होणे, ताप येणे, आक्रमक होणे, ही आहेत.