मध्यरात्रीच्या संसद अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार

देशात कर रचनेत मोठा बदल १ जूलै पासून सुरू होणार आहे. त्यासाठी मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलविले आहे. मात्र, काँग्रेसने अधिवेशनाला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

Updated: Jun 30, 2017, 10:29 AM IST
मध्यरात्रीच्या संसद अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार  title=

नवी दिल्ली : देशात कर रचनेत मोठा बदल १ जूलै पासून सुरू होणार आहे. त्यासाठी मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलविले आहे. मात्र, काँग्रेसने अधिवेशनाला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

आज संसदेत होणाऱ्या जीएसटीच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय. सोनिया गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली... आज मध्यरात्री जीएसटीच्या लॉन्चिंगसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोदींसोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांनाही मंचावर स्थान देण्यात येणार होतं. पण आता काँग्रेसनं या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मात्र जीएसटीचं राजकारण करू नये, असं आवाहन केलंय...

जीएसटी म्हणजे नेमकं काय?

शनिवार १ जुलै २०१७... हा दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक वेगळा अध्याय सुरु होतोय... या अध्यायानं  देशाच्या अर्थव्यवस्थेचा चेहारा मोहोरा बदलतोय. क्लिष्ट आणि करचोरीला प्रोत्साहन देणारी करप्रणाली इतिहास जमा होतेय... अप्रत्यक्ष करांच्या जंजाळातून देश मुक्त होतोय... देशात अप्रत्यक्ष करांची नवी प्रणाली लागू होतेय...जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १ जुलैपासून लागू होतेय... 

देशात सध्या अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर लागू आहेत. त्यात उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज ड्यूटी, केंद्रीय विक्रीकर, मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट, जकात, एलबीटी, राज्यांचे अधिभार, स्थानिक प्रवेश कर, असे अनेक कर एकाच वस्तूवर लागतात.

हे अप्रत्यक्ष कर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे वस्तूंच्या किंमतीत स्थलपरत्वे फरक पडतो. शिवाय प्रत्येक सेवेवर वेगळा सेवा कर लावण्यात येतो. जीएसटी करप्रणाली अंतर्गत स्थानिक, राज्यस्तरीय आणि केंद्रीय अप्रत्यक्ष सगळे कर विलीन करून एकच कर लावण्यात येईल.

त्याचे दर निश्चित करण्यासाठी जीएसटी कौन्सिल स्थापन करण्यात आली आहे. देशात तयार होणाऱ्या, आयात होणाऱ्या, निर्यात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवर एकच कर लागेल. 

एक जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीचे दर निश्चित करण्य़ात आले आहे. शून्य, पाच, बारा, अठरा, आणि अठ्ठावीस टक्के दरानं हा कर लावण्यात येणार आहे.  

जीएसटीच्या काही गोष्टी स्वस्त होतील... काही गोष्टी महाग होतील... सगळी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे कर चोरीचं प्रमाण घटणार आहे. सुरुवातीचे काही दिवस अडचणी येणार हे स्वाभाविक आहे. पण सगळी सिस्टम लवकरच स्थिरावेल अशी आशा करायला हरकत नाही.