लखनऊ: सध्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये जोमाने प्रचार करत आहेत. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाराणसी आणि अयोध्या दौऱ्याची प्रसारमाध्यमांमध्ये चांगली चर्चाही होती. यावेळी अयोध्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंका नुवाना कुआना भागात असताना हा प्रकार घडला. यावेळी काँग्रेसचा विशाल सोनकर हा कार्यकर्ता प्रियंका यांना भेटायला आला होता. त्याने प्रियंका यांना भेट द्यायला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तसबीर आणली होती. मात्र, आजुबाजूला असलेल्या गर्दीमुळे ही तसबीर प्रियंका गांधी यांच्याकडे देताना त्याची काच फुटली. त्यामुळे विशालच्या हाताला जखम झाली आणि त्यामधून रक्त वाहू लागले. तेव्हा प्रियंका गांधी यांनी विशालला तेथेच थांबायला सांगितले. त्यांनी गाडीतील प्रथोमपचार पेटीतून मलम काढून ते विशालच्या हातावर लावले. यानंतर त्यांनी विशालच्या हाताला व्यवस्थितपणे बँडेजही बांधले. गर्दीमुळे प्रियंका गाडीतून उतरू शकल्या नाहीत. मात्र, त्यांनी आपल्या ताफ्यासोबत असणाऱ्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांना विशालवर उपचार करण्यासही सांगितले. साहजिकच प्रियंका गांधी यांचा हा साधेपणा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला.
यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एका जखमी पत्रकाराला अशाप्रकारे मदत केली होती. राजस्थानमधील पत्रकार राजेंद्र व्यास यांचा दिल्लीतील हुमायु रोडवर अपघातात झाला होता. यात ते जखमी झाले होते. त्यांचा अपघात झाला त्याच वेळी त्या रस्त्याने राहुल गांधींच्या वाहनांचा ताफा जात होता. अपघाताची घटना पाहताच राहुल गांधींनी आपली गाडी रस्त्याकडे घेत व्यास यांची विचारपूस केली. यानंतर त्यांनी व्यास यांना आपल्या गाडीत बसवून रुग्णालयापर्यंत सोडले होते.