अनुच्छेद ३७० : भूतान, मालदीवनंतर आता बांगलादेशची प्रतिक्रिया

 भारत सरकारने जम्मू काश्मीर येथून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जगभरातील देशांनी यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Updated: Aug 21, 2019, 04:02 PM IST
अनुच्छेद ३७० : भूतान, मालदीवनंतर आता बांगलादेशची प्रतिक्रिया  title=

नवी दिल्ली : भारत सरकारने जम्मू काश्मीर येथून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जगभरातील देशांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भूतान, मालदीवनंतर आता बांगलादेशनेही याचे समर्थन केले आहे. भारत सरकारने अनुच्छेद ३७० कलम हटविणे हे भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. क्षेत्रीय शांती तसेच स्थिरता ठेवत विकास साधणे ही सर्वच देशांची प्राथमिकता असायला हवी या मताचा बांगलादेश आहे. श्रीलंकेने याआधीच भारताच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. 

मालदीवने देखील भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक स्वयंभू देशाने आपल्या कायद्याच्या आवश्यकतेनुसार संशोधन करायला हवे असे आमचे म्हणणे असल्याचे मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

भूताननेही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी दोन दिवसांआधी भूतानचा दौरा केला होता. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी भूतानच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. काश्मीरचे प्रकरण भारताचे अंतर्गत असल्याचे भूतानने म्हटल्याचे गोखले यांनी म्हटले.