नवी दिल्ली: आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) फज्जा उडाल्यामुळे मोदी सरकारने आपला गिअर बदलला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राष्ट्रीय लोकसंख्या सूचीचा (NPR) विषय पुढे आणू पाहत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केला. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चिदंबरम यांनी म्हटले की, NPR हे दुसरे-तिसरे काहीही नसून छुप्या मार्गाने NRC लागू करण्याचा प्रयत्न आहे. CAA आणि NPR विरोधात लढा देणे आणि जनाधार जमवणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी चिदंबरम यांनी सांगितले.
Congress leader P Chidambaram in Kolkata: I want all opposition parties to realize the gravity of the issue at stake and come together on one platform. #CAA #NRC pic.twitter.com/4Ai31jFSm9
— ANI (@ANI) January 18, 2020
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोधकांची ताकद जोखता आली नाही. विरोधाचे ढग थोड्या दिवसात सरतील, हा त्यांचा अंदाज सपशेल फसल्याचेही यावेळी चिदंबरम यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात NRC आणि CAA वरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यापासून आसामसह देशभरात आंदोलने करण्यात आली होती. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दिल्लीतही यावरून वातावरण प्रचंड तापले होते. या सगळ्या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भूमिका काहीशी मवाळ होताना दिसली होती. देशात NRC लागू करण्यासंदर्भात आम्ही कोणताही विचार केलेला नाही. आम्ही यासंदर्भात साधी चर्चाही केलेली नाही, असे मोदी आणि शहा यांनी सांगितले होते.