नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं कारवाई केली आहे. अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्याकडे नेण्याचा आरोप दीप सिद्धूवर आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल 14 दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.
26 जानेवारीला दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 27 जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दीप सिद्धू (Deep Sidhu) वर भडकावणारं भाषण आणि हिंसे प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. दीप सिद्धू विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. पण तो समोर आला नाही. त्यानंतर पोलिसांनी दीप सिद्धूच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
कोण आहे दीप सिंह सिद्धू?
दीप सिंह सिद्धू (Deep Singh Sidhu) याचा जन्म 1984 मध्ये पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील एका सीख कुटुंबात झाला होता. त्याने पंजाबी माधम्यातून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने लॉची ड्रिग्री घेतली. त्यानंतर किंगफिशर मॉडल हंट आणि ग्रेसिम मिस्टर इंडिया स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्याने मॉडलिंग सुरु केलं. पण यश न मिळाल्याने तो परत लॉ क्षेत्रात आला.
सिद्धूने ब्रिटिश फर्म हॅमंड्स सोबत काम करताना डिज्नी, सोनी पिक्चर्स आणि बालाजी सारख्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलं. बालाजी टेलीफिल्म्समध्ये तो लीगल हेड म्हणून काम करत होता. त्याने पंजाबी सिनेमांमध्ये ही काम केलं आहे.