Crime News Today: पत्नीने पतीची हत्या केली अन् कोणाला संशय येऊ नये व आपण पकडले जाऊ नये म्हणून पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत जाऊन लपून बसली. या घटनेमुळं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या महिलेले सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याच्या मुलांनी सांगितले की त्यांच्या आई-वडिलांचे पैशांवरुन वाद झाले होते. त्यातून पत्नीने पतीवर रागात वार केले. हे प्रकरण झारखंड येथील दामोदरपुर डुमरी कुली येथील आहे. अजीत हांसदा असं मयत व्यक्तीचे नाव असून रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अजितची पत्नी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यामुळं तिच्यावरच संशय गेला.
अजीतच्या मृत्यूमुळं गावात एकच खळबळ माजली होती. तर, गावातील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार गावात असलेल्या एका विहिरीत कोणीतरी महिला लपून बसली असून तिच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे. तेव्हा पोलिस व गावकरी विहीरीपाशी आले. विहिरीत डोकावून पाहिलं असतं आतमध्ये अजितची पत्नीच लपून बसली होती. तिला बाहेर विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, ती बाहेर येण्यास तयारच नव्हती.
पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी महिलेला विहीरीबाहेर काढले. अजित हासंदा याची पत्नी सरस्वती देवी हिच असल्याची ओळख पटवण्यात आली. गावकऱ्यांनी सरस्वतीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण तितक्यात पोलिसांनी तिला गावकऱ्यांपासून वाचवले व जमावाला शांत केले. सरस्वतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजीतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
सरस्वतीने अजीतवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची गोष्ट कबुल केली आहे. पती अजीत नेहमीच पत्नी सरस्वतीला मारहाण करत असे. तसंच, घरातून बाहेर काढण्याची धमकी देत होता. ज्यादिवशी घटना घडली तेव्हादेखील त्याने मला मारहाण केली होती. त्याचदरम्यान मी त्याच्यार कुऱ्हाडीने हल्ला केला आणि घरातून बाहेर निघून गेली, असं सरस्वतीने पोलिस तपासात कबुल केले आहे.
पोलिसांनी सरस्वती आणि अजित यांच्या मुलाचाही कबुलीजबाब घेतला आहे. त्याने म्हटलं आहे की, आई-बाबा दोघही पैशांवरुन भांडत होते. मी मध्ये जागा झालो तेव्हा आई मला ओरडली व पुन्हा झोपायला सांगितले त्यानंतर मी पुन्हा झोपलो. सकाळी उठलो तेव्हा बाबांचा मृतदेह पडला होता आणि आई घरात नव्हती.