Accused Attempt To Rape Women In moving Train: देशात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याचे चित्र आहे. तरुणाने चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओरडा सुरू करताच तिला व तिच्या नातेवाईकांना चालत्या ट्रेनमधून खाली फेकले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मुज्जफरपूरमधून गुजरात येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
19 जून रोजी मजूर महिला तिच्या कुटुंबासह सुरत एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. लखनौ स्थानकात ती एक्स्प्रेसमध्ये चढली होती. त्यानंतर ग्वालिअर स्थानकात पाच जण एक्स्प्रेसमध्ये चढले होते. ते सर्व महिलेच्या समोरच्या सीटवर बसले होते. काही वेळानंतर आरोपींनी महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. तिने विरोध करायला सुरुवात केल्यानंतर आरोपींनी तिच्या नातेवाईकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या या वागण्याने धास्तावलेल्या महिलेसह तिचे नातेवाईक आरोपी ट्रेनच्या दरवाजात उभे राहिले होते. मात्र, तरीही आरोपींनी तिला त्रास देण सुरूच ठेवले.
महिला ट्रेनच्या दारात उभी असताना आरोपींनी तिथे जाऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यांना विरोध केला तसंच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून इतर प्रवासी जागे झाले तर आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी महिलेसह तिच्या कुटुंबीयांना चालत्या ट्रेनमधून खाली फेकले. सोमवारी रात्रभर महिला आणि तिचे नातेवाईक रेल्वे रुळांजवळ बेशुद्धावस्थेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी त्यांना तिथे पाहिल्यानंतर लगेचच पोलिसांना सूचना दिली. महिला व तिच्या नातेवाईकांना रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली त्यानंतर पीडित महिलेसह तिच्या नातेवाईकांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. महिलेने अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आम्ही घटना घडली त्यावेळी ट्रेनच्या डब्ब्यात किती प्रवासी होते. तसंच, गुन्ह्यात किती जणांचा सहभाग होता? याचा तपास केला जात आहे. ही घटना जनरल बोगीत घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलिस रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेले सीसीटिव्हींच्या आधारे आरोपींचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणात आरोपींना अटक करु. यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहेत.