Child Chewed Killed Snake: साप म्हटल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. काहींना केवळ सापाचं नाव ऐकलं तरी भीती वाटते. मात्र उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद जिल्ह्यामध्ये सापासंदर्भातील एक विचित्र प्रकारसमोर आला आहे. घराजवळील जुन्या भिंतीजवळ खेळत असलेल्या एका चिमुकल्याने चक्क एक साप चावला. त्याने केवळ हा साप चावलाच नाही तर एखाद्याने च्युइंग गम चावावं तसं चावून चावून या सापाचा जीव घेतला. हा मुलगा साप चावत असल्याचं त्याच्या आजीने पाहिले अन् तिला धक्काच बसला. हा मुलगा साप गिळणार इतक्यात तिने त्याच्या हातातून हा साप आजीचे खेचून घेतला. मेलेला हा साप एका प्लास्टीकच्या पिशवीत टाकून या मुलाला लोहिया हॉस्पिटलला घेऊन गेली.
मोहम्मदाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मदनापूर येथील रहिवाशी असलेल्या दिनेश कुमार नावाच्या व्यक्तीच्या साडेतीन वर्षाच्या मुलाबरोबर हा प्रकार घडला. सकाळी साडेआठच्या सुमारास हा मुलगा त्याच्या घरासमोर खेळ होता. अंगणातील एका भिंतीचं प्लास्टर निघालं असल्याने या भिंतीला पडलेल्या भगदाडामधून एक छोटा साप बाहेर आला. या मुलाने खेळता खेळता हा छोटा साप पकडला आणि तो आपल्या तोंडात ठेवला. त्यानंतर च्वींगमप्रमाणे हा मुलगा साप चावत राहिला. थोड्यावेळाने या मुलाची आजी घराबाहेर आली तर हा मुलगा काहीतरी चावत असल्याचं दिसलं. तिने मुलाच्या तोंडात बोट घालून तोंडातील गोष्ट बाहेर काढली असता तिला धक्काच बसला. हा मुलगा चक्क एक साप चावत असल्याचं पाहून आजीने आराडाओरड केला.
आजीचा आरडाओरड ऐकून या मुलाचा मोठा भाऊ अंकित बाहेर आला. त्याने एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा साप टाकला आणि तो आजीबरोबर छोट्या भावाला घेऊन लोहिया रुग्णालयात गेला. आपत्कालीन वॉर्डमधील डॉ. मोहम्मद अलीम अन्सारी यांनी या मुलाची तपासणी केली. हा मुलगा ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर या मुलाला घरी घेऊन जाण्यास डॉक्टरांनी सांगितलं. मात्र या सापाची अवस्था पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
आमचं बाळ अजून कोणतेही पदार्थ खात नाही केवळ दूध पितं. त्यामुळेच त्याने साप गिळला नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता अशी प्रतिक्रिया या मुलाच्या नातेवाईकांनी दिली. साप चावल्यानंतर या बाळाचं तोंड पांढरं पडलं होतं. मात्र या बाळाला सापाच्या विषचा त्रास झालेला नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. घडलेला प्रकार समोर आल्यानंतर एका लहान मुलाने च्युइंग गमप्रमाणे साप चावल्याने पंचक्रोषीमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.