Japanese Tourist Harrassed on Holi: दिल्लीमध्ये (Delhi) होळी (Holi) साजरी करत असताना परदेशी महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. होळीच्या दिवशी दिल्लीत एका जपानी महिलेला (Japanese Tourist Harrassed) तरुणांनी रंग लावण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओत तरुण महिलेच्या शरिराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं दिसत होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान याप्रकरणी संबंधित परदेशी महिलेने कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेने भारत सोडला असून आता बांगलादेशला गेली आहे. दुसरीकडे व्हिडीओत महिलेच्या तोंडावर रंग असल्याने तिची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जपानी दुतावासाला विनंती केली आहे. जपानी दुतावासाशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी आपल्याकडे या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
पीडित परदेशी महिला दिल्लीमधील पहाडगंज येथे वास्तव्यास होती. आरोपी तरुणही याच परिसरातील आहेत. धक्कादायक म्हणजे यामधील एक तरुण अल्पवयीन आहे.
पीडित महिलेने भारत सोडल्यानंतर ट्वीट करताना आपण बांगलादेशला पोहोचलो असल्याची माहिती दिली आहे. मला ही इतकी गंभीर घटना आहे याची कल्पना नव्हती. मी शारिरीक आणि मानसिकरित्या फिट आहे. लवकरच याबद्दल सविस्तर सांगने अशी माहिती दिली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुण जबरदस्ती जपानी महिलेला रंग लावत असल्याचं दिसत आहे. यावेळी त्यांनी तिला घेरलं असून शरिराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत 'होली है' ओरडत होते. यावेळी एकाने तिच्या डोक्यावर अंडही फोडलं. दरम्यान आपली सुटका करुन घेण्याआधी तरुणीने आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कानाखाली लगावल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
For those who were against the #BHARATMATRIMONY Holi campaign. A Japanese tourist in India. Imagine your sister, mother or wife being treated like this in another county? Maybe you will understand then. pic.twitter.com/VribIpXBab
— Ram Subramanian (@iramsubramanian) March 10, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
Very distrubing videos getting viral on social media showing sexual harassment with foreign nationals on Holi! I am issuing notice to Delhi Police to examine these videos and arrest the perpetrators! Completely shameful behaviour!
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) March 10, 2023
पोलिसांनी याप्रकरणी तपास करत व्हिडीओच्या माध्यमातून आरोपी तरुणांची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतलं. तरुणांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. "पहाडगंज पोलीस ठाण्यात परदेश महिलेशी असभ्य वर्तन झाल्याची कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, दरम्यान जपानी दुतावासाला ई-मेल पाठवत महिलेची ओळख पटवण्याची विनंती करण्यात आली आहे," असं पोलिसांनी सांगितलं आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर आरोपींवरील पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं पोलीस म्हणाले आहेत.