नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात होता, कारण कळताच संताप, मंडपात तुफान राडा

नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात असल्याने लग्न तुटल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाचे विधी सुरु असताना नवरदेव वारंवार उठून जात असल्याने वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि कानाखाली लगावली. यानंतर त्यानेही वडिलांना कानाखाली लगावल्याने एकच गोंधळ झाला.   

Updated: Jan 28, 2023, 12:49 PM IST
नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात होता, कारण कळताच संताप, मंडपात तुफान राडा  title=

लग्नाचे विधी सुरु असताना नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोली जात असल्याने अखेर लग्न मोडावं लागल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. मुलगा वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात असल्याने वडिलांनी त्याला रोखलं आणि समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वडिलांनी त्याला कानाखाली लगावली. सर्वांसमोर अपमान झाल्याने संतापलेल्या मुलानेही वडिलांना कानाखाली लगावत प्रत्युत्तर दिलं. पण या सर्व घटनेमुळे नवरीमुलगी संतापली आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. 

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चित्रकूट जिल्ह्याच्या शिवरामपूर येथील एका मुलीचं लग्न कानपूरमधील तरुणाशी ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी वरातदेखील वाजत-गाजत पोहोचली होती. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. लग्नात नवरीमुलीला पाहिल्यानंतर नवरदेवाने आपण तिला अजिबात दूर जाऊ द्यायचं नाही असं ठरवलं. 

नेमका वाद का झाला?

नवरदेवाला याची कल्पना होती की, लग्नानंतर 4-5 दिवसांनी नवरीमुलीला बऱ्यात दिवसांसाठी माहेरी पाठवलं जातं. पण ही गोष्ट त्याला अमान्य होती. यामुळे तो वारंवार मंडपातून उठून जात नवरीमुलीचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. 

वडिलांनी लगावली कानाखाली

लग्नाचे विधी सुरु असताना मुलगा वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात आहे ही बाब त्याच्या वडिलांना आवडली नाही. त्यांनी भरमंडपात मुलाला कानाखाली लगावली. वडिलांनी कानाखाली लगावल्यानंतर मुलाचाही पारा चढला आणि त्याने काही विचार न करता वडिलांना कानाखाली लगावली. यानंतर मंडपात एकच गोंधळ सुरु झाला. या सर्व प्रकारामुळे व्यथित झालेल्या नवरीमुलीने अशा कुटुंबात लग्न करणार नाही असा निर्णय घेतला. 

'एक वर्ष माहेरी पाठवणार नाही'

नवरीमुलीचा आरोप आहे की, नवरदेव अनेकदा तिच्याकडे आला आणि एक वर्ष माहेरी पाठवणार नाही असं सांगितलं. शिक्षण पूर्ण करायचं असेल तर सासरी करावं लागेल असंही त्याने सांगितलं. यामुळे नवरीमुलगी व्यथित होती. कानाखाली मारल्यानंतर तर तिच्या मनाला वेदना झाल्या आणि लग्न करण्यास नकार दिला. 

पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

नवरीमुलीच्या निर्णयानंतर लग्न रोखण्यात आलं. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही पक्ष काहीही ऐकण्यास तयार नव्हते. दोन्हीकडचे लोक आपण खर्च केलेले पैसे परत करण्याची मागणी करत होते. अखेर तडजोड करुन हे प्रकरण मिटवण्यात आलं आणि वरात नवरीमुलीला न घेताच परतली.