गुवाहाटी : ईशान्य भारतात आलेल्या पुरात बळी पडलेल्यांचा आकडा ८० वर गेलाय. गेल्या काही दिवसांत ईशान्येकडच्या अरुणाचलप्रदेश, आसाम आणि मणिपूरमधल्या ५८ जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. केंद्रीय ईशान्य भारत विकासमंत्री जितेंद्र सिंग यांनी ईशान्य भारतातल्या या पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
बचाव आणि मदतकार्यात केंद्र सरकार राज्य सरकारांना संपूर्ण सहकार्य करत असल्याचं सिंग यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही परिस्थितीची माहिती घेतलीये. नागालँडमध्येही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. दिमापूर जिल्ह्यात झुबझा नदीला पूर आलाय. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय.
दरम्यान या पूराचा फटका आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांनाही बसलाय. पार्कमध्ये सर्वत्र पूराचं पाणीच पाणी पाहायला मिळतंय. इथले प्राणी सुरक्षित जागेच्या शोधात फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. पूराच्या पाण्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येतेय. पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राणी रस्त्यावर आलेत.