७५ वर्षीय महिलेकडून बाळाला जन्म

आयव्हीएफच्या माध्यमातून दिला बाळाला जन्म

Updated: Oct 15, 2019, 12:23 PM IST
७५ वर्षीय महिलेकडून बाळाला जन्म  title=
संग्रहित फोटो

जयपूर : कोटामध्ये एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेने आयव्हीएफच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी या मुलीचं वजन ६०० ग्रॅम असून तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं. या महिलेला कोटातील किंकर रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. बाल रोग विशेषज्ञांची टीम मुलीची देखभाल करत आहे. 

रुग्णालयातील डॉक्टर अभिलाषा किंकर यांनी सांगितलं की, त्या महिलेने आधी एका बाळाला दत्तक घेतलं आहे. पण तिला तिचं स्वत:च बाळ हवं होतं. आणि म्हणूनच तिने आई होण्याच्या शक्यतांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला.

आयव्हीएफच्या माध्यमातून, महिलेने मुलीला जन्म दिला. आईच्या वयानुसार, गर्भ राहिल्यानंतर ६.५ महिन्यांनंतर बाळाचा सी-सेक्शनद्वारे वेळेआधीच जन्म झाला. कारण महिला शारीरिकदृष्ट्या कमजोर असल्याना हा निर्णय घेण्यात आला. सर्वात मोठी बाब म्हणजे महिलेचं केवळ एकच फुफ्फस सुस्थितीत असल्याने डॉक्टरांच्या टीमसाठी हे मोठं आव्हान होतं.

महिला ग्रामीण भागातील असून ती शेतकरी कुटुंबातील आहे. तिला स्वत:चं बाळ हवं होतं आणि यामुळे आम्ही सर्वच अतिशय आश्चर्यचकित झालो असल्याचं किंकर यांनी सांगितलं.